घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प एक अभिनव उपक्रम
स्वच्छ सुंदर सातारा
सातारा दि.14 पालकमंत्री महोदय शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन विकास निधीतून (DPDC) पहिल्यांदाच ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे सातारा जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे ग्रामीण भागातील सुक्या कचऱ्याचे, प्लास्टिक, इ. न कुजणारा कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्याने स्वच्छतेच्या बाबतीत सन २००१ साला पासून मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील उघड्यावर हागणदारीचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शंभर टक्के लोकांच्याकडे वैपक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण झाली असून त्या सुविधेचा वापर ग्रामीण भागातील लोक करताना दिसत आहेत, यामुळे आरोग्यमान सुधारले आहे. सध्या उघड्यावरील शौचविधीचा प्रश्न निकाली निघाला असला तरी सुद्धा उघड्यावर पडणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची मोठी समस्या जिल्ह्यात भासत आहे. प्रत्येक गावाच्या सुरुवातीला गावाच्या कडेला रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या कचरा पडलेला दिसत असून गावाचे ओंगळवाणी रूप दिसत आहे.
सातारा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा निर्मूलन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद सातारा येथे पालकमंत्री, सातारा जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्लास्टीक निर्मुलन करणेबाबत बैठकीचे आयोजन दि.21 जुलै 2025 रोजी करणेत आले होते. सदर बैठकीस संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा, याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, तसेच सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका, परिषदांचे मुख्याधिकारी तसेच सर्व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्याकडेला आढळून येणारा कचराः व इतर स्वच्छता या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्लास्टीक कचरा निर्मुलन मोहिम तीव्र करण्यात आली आहे. गावालगतचे रस्ते, महामार्गाचे बाजूस अस्ताव्यस्त विखुरलेले प्लॅस्टिकचे व्यवस्थापन सुयोग्य पध्दतीने करणेत येत आहे. ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो त्या ठिकाणी CCTV बसविण्यात आले आहेत. CCTV मध्ये कचरा टाकताना आढळुन येणा-या व्यक्ती दुकानदार व विक्रेते यांचेदर दंडात्मक कारवाई केलेली आहे. प्रंसगी रात्रगस्त घालून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडणेत येत आहे. तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्या अधिनस्त कर्मचा-यांची पथके करून उघड्यावर कचरा टाकणा-या लोकांच्यावर कारवाई करून १ लाख 60 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरील प्रतिबंधात्मक कारवाई मोहिम राबविण्यात येत असली तरी सुध्दा गावस्तरावर जमा केलेले प्लास्टीक कचऱ्यााचा पुर्नवापर व त्याचे शाश्वत व्यवस्थापन करणेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपुर्ण योजना मधील घटकांमध्ये विविध नाविन्यपुर्ण योजनांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. सातारा जिल्हयातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापनांसाठी पहिल्यांदाच ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी पालक मंत्री यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे.
सदरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (सुका कचरा विलगीकरण व व्यवस्थापन आणि ओला कचरा पासुन बायोडायजेस्टरच्या सहाय्याने खत निर्मिती) या करिता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ आणि जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) मार्फत प्रस्तावीत निधी यांच्या अभिसरणाव्दारे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून प्रकल्पासाठी आवश्यक निधी प्रस्तावित केला जाणार आहे या प्रकल्पाची क्षमता साधारण 3 ते 5 TPD (Tonne Per Day) इतकी असून अंदाजे 30,000 ते 40,000 लोकसंख्येमागे निर्माण होणारा सुका कचरा या प्रकल्पाव्दारे व्यवस्थापन केला जाणार आहे. या केंद्रांमधून न कुजणाऱ्या, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पामुळे प्लास्टिक, कागद, काच, धातू आणि इतर पुनर्वापर योग्य साहित्याचे वर्गीकरण व पुनर्निर्मिती उद्योगांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल. हा प्रकल्प स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, यामुळे ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी सुविधा मिळणार आहेत तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि जनजागृती वाढेल













