“मिरवायचे नाही आणि कुणाची जिरवायची ही नाही…”प्रा. डॉ. नितीन कदम यांचे प्रतिपादन
![]()
वाईच्या विकासकामांना नवी दिशा देण्यासाठी माझी उमेदवारी असेल.
वाई / प्रतिनिधी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपण उभे राहण्याचा निर्धार केला आहे. मला केवळ मिरवायचे नाही किंवा कुणाची जिरवायची ही नाही तर व्यवस्था बदलवण्याचा व आगामी 25 वर्षांच्या विकास कामांचा विचार करून वाईला नवी दिशा देण्याचा निर्धार करून मी हा निर्णय घेतला आहे. त्याकडे राजकीय भूमिका म्हणून कोणीही पाहू नये, असे दिशा अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. नितीन कदम यांनी म्हटले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना वाईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, केवळ रस्ते, गटार, वीज, आरोग्य असे प्रश्न सोडवणे म्हणजे विकास नव्हे, तर शहराच्या विकासाचा परिपूर्ण मास्टर प्लॅन घेऊन आपण निवडणुकीत उतरत आहोत. पर्यटन, रोजगार, उच्च शिक्षण आणि सहकार या दृष्टीने वाईचा उत्तम विकास होण्याच्या दृष्टीने आपण नियोजनबद्ध आराखडा केला आहे. संपूर्ण राज्यभरात नावाजलेल्या दिशा अकॅडमीच्या माध्यमातून आपण यशस्वी व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला आहे. त्या अनुभवाच्या बळावर माझ्यासारखा सुशिक्षित व उच्चशिक्षित उमेदवार शहराच्या विकासाला समर्पित भावनेतून नवा चेहरा मोहरा देईल.
मदत व पुनर्वसन खात्याची संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळत ना. मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून तीनही तालुक्यांचा मोठा विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली आपणास उमेदवारी मिळावी, असा माझ्या समर्थकांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह आहे. आजवर कृष्णा नदी प्रदूषण विरहित होण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत आपण उच्च स्तरावरून मोठ्या प्रमाणावर निधी आणला होता तसेच कृष्णा स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय योगदान दिले होते. तर दिशा अकॅडमीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात अचूक मार्गदर्शन करतानाच गोरगरीब व एकल पालक असलेले विद्यार्थी आणि सैनिक पाल्य यांच्यासाठी विशेष सवलत देऊन आपण दिशा अकॅडमीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण केली आहे.
आपण दिलेल्या संस्कार शिदोरीतून अनेक विद्यार्थी आज देशभरात आणि परदेशातही उच्च पदांवर कार्यरत आहेत. तर उज्वल शैक्षणिक क्रांती घडवण्यामध्ये दिशा अकॅडमी व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, सहकार विषयक विविध उपक्रमांमध्ये ही आपण काम केले आहे. त्यामुळे या सर्व अनुभवाचा फायदा नगराध्यक्ष म्हणून काम करताना होऊ शकेल. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी स्वकर्तृत्वाने सर्वांच्या सहकार्यातून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांची उभारणी करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे निश्चितच या पदाचा सन्मान होईल व विकास कामांसाठी काम करणारा नवा चेहरा वाई नगरीस मिळेल अशी आपली खात्री आहे.
नेतृत्वाकडून ही आपल्याच उमेदवारीला प्राधान्य मिळेल, असा विश्वासही श्री कदम यांनी यावेळी व्यक्त केला.













