“कलास्पर्श स्मरणिका” म्हणजे उच्च पराकोटीची सांस्कृतिक गाथाच
![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी ‘संकल्प मीडिया’निर्मित स्मरणिकेविषयी काढले गौरवोद्गार
वाई / प्रतिनिधी : शाहीर साबळे स्मृती स्मारकाच्या संकल्प कोनशीला अनावरणाच्या निमित्ताने संकल्प माध्यम समूहातर्फे साकारलेली “कलास्पर्श स्मरणिका” म्हणजे उच्च पराकोटीची सांस्कृतिक गाथाच आहे. कला, संस्कृतीच्या क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वांसह घटना घडामोडींचा आढावा घेणारी ही स्मरणिका खऱ्या अर्थाने कला, संस्कृतीचा लेखाजोखा ठरणारा बहुमोल दस्तऐवज ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या शतकोत्तर जयंतीवर्षानिमित्ताने एकसर येथील स्मृती स्मारकाचे कोनशीला अनावरण आणि पसरणी येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात नामदार पवार बोलत होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित शाहीर साबळेंवरील चरित्र ग्रंथ आणि संकल्प माध्यम समूह निर्मित आणि मुख्य संपादक अशोक इथापे यांनी संपादीत केलेल्या “कलास्पर्श” या विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही याच कार्यक्रमात करण्यात आले.
यास्मरनिकेमध्ये शाहीर साबळे यांच्यासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, शकुंतलाबाई नगरकर, सातारचे सुपुत्र व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, नाम फाउंडेशनचे प्रमुख व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते प्रसाद ओक, प्रवीण तरडे, सुबोध भावे, छत्रपती शिवराय व धर्मवीर संभाजीराजे यांच्या भूमिका साकारणारे अमोल कोल्हे, वाईचे सुपुत्र व प्रसिद्ध कला दिग्दर्शक निलेश चौधरी, पसरणीच्या सुकन्या व अभिनेत्री अश्विनी महांगडे, विग मेकर विजय सकपाळ, सुप्रसिद्ध चित्रकार दिनकर जाधव, शिल्पकार संदीप लोंढे आदींवरील लेख व मुलाखतींचा समावेश आहे.
संकल्प माध्यम समूहाने प्रसिद्ध केलेला हा अंक संपूर्ण रंगीत छपाई व दर्जेदार निर्मिती मूल्य असलेला सांस्कृतिक ठेवा असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा पाटील यांच्यासह पुसेगावच्या सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, माई साबळे, यशोधराताई शिंदे, तसेच शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.
ना. मकरंदआबा पाटील यांनी संपादक अशोक इथापे यांच्या अभ्यासू, जिद्दी व कल्पक स्वभावामुळेच स्मरणिकेची निर्मिती झाल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रियपणे सहभाग घेऊन सातत्याने प्रयत्न केल्याचे आवर्जून सांगितले. एवढ्या मोठ्या बहुआयामी कार्यक्रमात श्री. इथापे यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचेही नामदार पाटील म्हणाले.
संपादक अशोक इथापे यांनी या अंकाच्या निर्मितीचा इतिहास विशद केला. तसेच या स्मरणीकेसाठी लेखन करणाऱ्या सर्व लेखक, जाहिरातदार व पडद्यामागील सूत्रधारांचे आभार मानले. स्वागताध्यक्ष नामदार मकरंदआबा पाटील, शाहीर साबळे प्रतिष्ठान, एकसर, कुसगाव व पसरणी ग्रामस्थ आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांनी या अंकाच्या निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल व संकल्प कोनशीला अनावरणाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात या स्मरणिकेचे प्रकाशन करण्याचा योग आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.













