Thu, Jan 15, 2026
साहित्य

शाहिरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपायला हवा : ना. अजितदादा पवार

शाहिरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपायला हवा : ना. अजितदादा पवार
Ashok Ithape
  • PublishedOctober 26, 2025

शाहीर साबळे यांच्या स्मृती स्मारकाचे भूमिपूजन : पसरणीत जाहीर सभा उत्साहात

वाई / प्रतिनिधी : शाहीर कृष्णराव साबळे यांनी समाजजागृतीसाठी शाहिरीच्या माध्यमातून बहुमोल योगदान दिले. तसेच स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी क्रांतीकारक भूमिका बजावली होती. सातारा जिल्ह्याच्या या भूमिपुत्राचे जन्मभूमीत उचित स्मारक पूर्ण होण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. शाहिरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे मत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

एकसर, ता. वाई येथील शाहिर साबळे यांच्या संकल्प स्मृती स्मारकाच्या कोनशीला अनावरणानंतर पसरणी येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. स्वागताध्यक्ष ना. मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, ॲड उदयसिंह उंडाळकर, राजेश वाठारकर, राजूशेठ राजपुरे, राजेंद्र तांबे, सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, दैनिक पुढारीचे संपादक हरीश पाटणे, ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, श्रीमती राधाबाई साबळे, शाहीर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम निकम, यशोधरा शिंदे, संजय साबळे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, कैलास महापदी, बाळासाहेब सोळस्कर, रिपब्लिकन पक्षाचे अशोकबापू गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ना. अजितदादा पवार पुढे म्हणाले की, शाहीर साबळे यांचे स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कार्य जगासमोर यावे म्हणून त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे स्मृतीस्मारक त्यांच्या जन्मभूमीत उभारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. केवळ भूमिपूजन करून आपण थांबणार नाही, तर या स्मारकाची भव्यदिव्य इमारत पूर्णत्वास नेईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगून नियोजित इमारतीच्या उभारणीतील प्रत्येक टप्प्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली तसेच आर्किटेक्चर श्री. गद्रे यांना योग्य त्या सूचना केल्या.

पत्रकार मित्र हरिष पाटणे आणि विनोद कुलकर्णी या दोघांच्या सत्काराचा धागा पकडून अजित पवार यांनी या दोघांचा जय वीरू जोडी असा उल्लेख केला. व दोघांचेही अभिनंदन केले. मात्र यातला जय कोणता विरू कोणता हे काय तुम्ही मला विचारायचं नाही अन मी सांगणार पण नाही असा ‘बॉम्ब’ टाकला. यातील जय विरु वाईकरांनी ओळखावेत नाहीतर मकरंद आबांनी ओळखावेत असा पलटवार केला यावेळी उपस्थितांमध्ये मोठी खसखस पिकली

ना. मकरंद पाटील म्हणाले की, पसरणी गावाने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांची देणगी समाजास दिली आहे. त्यामध्ये शाहिर साबळे व उद्योगपती बी. जी. शिर्के हे दोन पद्मश्री आणि बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्री. दाहोत्रे यांचा समावेश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणाला दिशा देणारे शाहीर साबळे यांचे योगदान पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे स्मृति स्मारक उभारण्याचे कार्य अजितदादांच्या हस्ते होत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी त्यान्च्या भाषणात शाहिरांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित “महाराष्ट्रशाहिर कृष्णराव गणपतराव साबळे” या चरित्रग्रंथासह संकल्प माध्यमसमूह निर्मित व अशोक इथापे संपादित “क्लास्पर्श” या स्मरणिकेचे प्रकाशन प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

“जय जय महाराष्ट्र माझा..” या राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यभरातून आलेल्या लोककलावंतांनी शाहीर साबळे यांच्या गीतांचे सादरीकरण करून शाहिरांना मानवंदना दिली. त्यामध्ये देवानंद माळी, सांगली व अन्य कलावंतांचा समावेश होता.

कार्यक्रमास अनिल सावंत, भैय्या डोंगरे, रामदास इथापे, बाळासाहेब चिरगुट , यशवंत जमदाडे, विजयराव इथापे, विक्रम वाघ, प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, राजेंद्र शेठ राजपुरे, चरण गायकवाड, भूषण गायकवा, शशिकांत पवार, सत्यजित वीर, मनिष भंडारे, मोहन जाधव, अशोक गायकवाड, पसरणीगावच्या सरपंच हेमलता गायकवाड, महेंद्र पुजारी, आप्पा येवले, बाजीराव महांगडे, बद्रीनाथ महांगडे, डॉक्टर मंगेश महांगडे, धनंजय महांगडे, राजेश शिंदे, बाबूनाना महांगडे, आदींसह वाई, पसरणी, कुसगाव, एक्सर, व्याहळी येथील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कलास्पर्श” स्मरणीकेचे कौतुक – या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक संकल्प माध्यमसमूह निर्मित व अशोक इथापे संपादित “कलास्पर्श” या स्मरणिकेचे ना. अजितदादा यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले. तसेच या ग्रन्थनिर्मितीसाठी योगदान दिलेल्या “टीम संकल्प”च्या प्रयत्नांना दाद दिली.

———————————————————

प्रा. नवनाथ देशमुख यांना “शिक्षकगौरव” पुरस्कार प्रदान – साताऱ्यातील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्रा. नवनाथ देशमुख यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावेळी ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते “शिक्षकगौरव” पुरस्काराने गौरवण्यात आले.

शाहिर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर जगताप यांनी आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!