पद्मश्री शाहीर साबळे स्मारक कोनशिला अनावरण सोहळ्याच्या तयारीला वेग, येत्या रविवारी एकसरमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत भूमिपूजन
![]()
स्वागताध्यक्ष ना. मकरंदआबा यांनी घेतला तयारीचा आढावा
वाई / प्रतिनिधी : शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जन्मजयंती वर्षानिमित्ताने एकसर, ता. वाई येथे 26 ऑक्टोबर रोजी शाहीर साबळे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्यातील मंत्र्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा स्वागताध्यक्ष ना. मकरंद पाटील यांनी आज घेतला.
शाहीर साबळे स्मारकाचे भूमिपूजन, नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत शाहीर साबळे यांच्या गीतांचे सादरीकरण करणारा मानवंदना समारंभ आणि प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित चरित्र ग्रंथ आणि संकल्प न्यूज संपादित “कलास्पर्श” स्मरणिकेचे प्रकाशन, पुरस्कार वितरण सन्मानसोहळा असा हा भरगच्च कार्यक्रम असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
शाहीर साबळे यांची जन्मभूमी असलेल्या वाई तालुक्यात होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहिरांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात शाहिरांवर प्रेम करणाऱ्या आणि सांस्कृतिक उपक्रमांची आवड असणाऱ्या सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, पुसेगावच्या सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती असल्याने प्रशासकीय स्तरावरील तयारीचा आढावा तसेच शाहीर साबळे प्रतिष्ठान व स्थानिक संयोजकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या तयारीला आलेला वेग याचा आढावा स्वागताध्यक्ष म्हणून ना. मकरंदआबा पाटील यांनी घेतला व कार्यक्रम उत्तम होण्यासाठी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.













