मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेसाठी वाई येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेच आयोजन
वाई l प्रतिनिधी – किसन वीर महाविद्यालय, वाईच्या मानसशास्त्र विभागातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी मानसिक आरोग्यविषयक तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष असून, व्याख्यानमाला ८, ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सायं. ७ ते ८ या वेळेत टिळक ग्रंथालय, वाई येथे होणार आहे.
दिनांक ८ रोजी प्राचार्य डॉ. दिवाण, दिनांक ९ रोजी प्रा. विवेक बेल्हेकर (मुंबई विद्यापीठ), तर दिनांक १० रोजी डॉ. प्रवीण पारगावकर (मन प्रभोदिनी, पुणे) हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

मानसशास्त्राचे ज्ञान हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. आजच्या तणावग्रस्त जगात सकारात्मक विचार, संवादकौशल्य आणि मानसिक संतुलन यांची गरज अधोरेखित करण्यासाठी ही व्याख्यानमाला उपयुक्त ठरणार आहे.
किसन वीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे सर्व वाईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे व मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ आनंद घोरपडे यांनी केले आहे.













