सातारा पोलिसांकडून वाई-भुईंज परिसरातील ४ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार
भुईंज, दि. 30 : सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील भुईंज परिसरात सातत्याने शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या एका टोळीतील चार सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. यामुळे वाई तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये टोळीचा प्रमुख मयुर शिवाजी भोसले (वय २०, रा. खालचे चाहुर, भुईंज, ता. वाई, जि. सातारा) आणि टोळी सदस्य संदिप सुरेश पवार (वय २४, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा), विशाल सुभाष भोसले (वय २३, रा. विराटनगर, पाचवड, ता. वाई, जि. सातारा) आणि अमर विलास माने (वय १९, रा. विराटनगर, पाचवड, ता. वाई, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
या टोळीवर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ, दमदाटी करून दुखापत पोहोचवणे, चारचाकी मोटार वाहन पेटवून देऊन आगळीक करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, श्री. बी. वाय. भालचिम यांनी केली होती. या गुन्हेगारांवर वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताही धाक राहिला नसल्यामुळे वाई तालुका परिसरातील लोकांना या टोळीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
मा. तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासमोर टोळी प्रमुख मयुर शिवाजी भोसले आणि टोळी सदस्य संदिप सुरेश पवार, विशाल सुभाष भोसले, अमर विलास माने यांची सुनावणी होऊन, या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईसाठी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस आणि भुईंज पोलीस ठाण्याचे पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, सागर मोहीते यांनी योग्य पुरावा सादर केला.)
संदर्भ:•सातारा पोलीस दलाने जारी केलेली माहिती.













