देगाव येथे महसूल सेवा पंधरवडा कार्यक्रमात दाखल्यांचे वाटप
![]()
ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ
वाई : वाई तालुक्यातील देगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात ग्रामस्थांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी, २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. मंडल अधिकारी श्रीमती शीतल अडसूळ यांच्या हस्ते हे दाखले वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली.
शासनाच्या या उपक्रमामुळे गावातील गरीब नागरिक, शेतकरी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होत आहे. मंडल अधिकारी यांनी या प्रसंगी बोलताना, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यातून कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो, याची माहिती दिली आणि जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये आधार कार्ड विभागाचे गायकवाड, कृषी विभागाचे विनोद शेळके, पुरवठा विभागाचे रितेश राजपुरे, आरोग्य विभागाच्या डॉक्टर अनुराधा इंगोले, पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर संजय माने, वन विभागाचे साक्षी शिंदे, महावितरण विभागाचे अंकुल दाभार्डे, मतदान नोंदणी विभागाच्या बी.एल.ओ. राजश्री इथापे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागाचे सचिन मांढरे, पोस्ट ऑफिस विभागाचे शिवाजी इथापे, ग्राम महसूल विभागाचे महसूल अधिकारी श्री पालवे आणि ग्रामपंचायत विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी श्री बोभाटे यांचा समावेश होता.
या प्रसंगी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना संचालक श्री रामदास इथापे, शेंदुरजने ग्राम महसूल अधिकारी श्री शेख, ग्रामपंचायत देगावचे सरपंच श्री सुरज पिसाळ, उपसरपंच श्री किरण इथापे, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, महसूल सहाय्यक प्रवीण इथापे यांच्यासह देगाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती आणि लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.













