Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम – पालकमंत्री शंभूराज देसाई

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedSeptember 29, 2025

सातारा दि.29 : अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरासर परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी बाधितांनी खचून जावू नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळेल अशी ग्वाही देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी अतिवृष्टीमुळे माण तालुक्यातील गोंदवले बु, लोधवडे, पिंपरी व म्हसवड शहरातील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. या पहाणी प्रसंगी प्रांताधिकारी उज्वला गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अतिवृष्टी बाधीत कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरातील दुकांनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. तसेच परिसरातील शेती, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे तातडीने करावे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करावा. अतिवृष्टी बाधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशीही ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी अतिवृष्टी बाधितांना दिली.

या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. उध्वस्त झालेल्या पिकांकडे अत्यंत केविलवाण्या, उदासवाण्या नजरेने पहात शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या. या दौऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उध्वस्त झालेल्या कोबी, कांदा, मका आदी पिकांची पाहणी केली, नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनाला ते तातडीने सादर केले जातील शासनाकडून दिवाळीपूर्वी मदत उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते त्यांना त्यांनी त्यांच्या विभागाशी निगडित पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!