पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध, परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर
सातारा दि. 25: महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब हे नवरात्रोत्सवातील नऊ दिवस पायातील चपलांचा त्याग करून उपवास पाळतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी हे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. यंदा नवरात्रोत्सवाच्या काळातच मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बाधित क्षेत्रांचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेला धीर दिला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणतीही तमा न बाळगता दुचाकीवरून चिखलातून अनवाणी फिरत शेतकऱ्यांचा बांध गाठला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खंबीर आहे असा विश्वास दिला. त्याचबरोबर नुकसानीच्या भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही दिले.
या काळातही त्यांनी ना चप्पल घातल्या, ना उपवास सोडला. त्याग, कष्ट, कर्तृत्व आणि भक्ती यांचा वारसा जपत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना हा समाजकार्याचा वसा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडून मिळाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या समाजसेवेचा वारसा मंत्री शंभूराज देसाई हे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या संवेदनशिलतेबद्दल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.













