श्रद्धा आणि उत्साहाचा संगम : भवानीमाता नवरात्र उत्सव आसले.
आसले : भवानी माता मंदीत आसले येथे येत्या 21 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून गावातील एकात्मतेचे प्रतीक आहे. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे आयोजन जय भवानी ट्रस्ट आसले यांच्या वतीने होत आहे. गावातील तरुण मंडळी या आयोजनात पुढाकार घेऊन विविध उपक्रमांचे नियोजन करीत आहेत. प्रशासन आणि पोलिस विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळत असल्याने उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवरात्र काळात दररोज आरती,भजन तसेच देवीची भव्य आरास दर्शनासाठी खुली राहणार आहे. मंदिर परिसर आकर्षक रोषणाई, फुलांच्या सजावटी व धार्मिक वातावरणाने उजळून निघणार आहे. यामुळे संपूर्ण आसले गाव भक्तिमय होणार आहे. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक भवानी मातेच्या दर्शनासाठी आसले येथे दाखल होतात. देवी भवानीमाता ही शक्तीची अधिष्ठात्री, शौर्य आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. “देवीच्या दर्शनाने संकटांचे निवारण होते, जीवनात सुख-शांती लाभते आणि मनाला समाधान मिळते,” असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. यामुळेच दरवर्षी वाढत्या संख्येने भाविक नवरात्रात आसलेला भेट देतात.
लोकांची श्रद्धा आणि विश्वास हेच या नवरात्र उत्सवाचे मोठे बळ आहे. अनेक भाविक संपूर्ण नवरात्र उपवास पाळून देवीच्या आराधनेत सहभागी होतात. तर काही जण दररोज आरती-कीर्तनाला उपस्थित राहून आपली भक्ती व्यक्त करतात. गावात आणि परिसरात देवी भवानीविषयी असलेला आदर, निष्ठा आणि प्रेम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरतो.
यंदा नवरात्र उत्सवामुळे आसले गाव उत्साह, भक्तिभाव आणि सकारात्मक ऊर्जेने उजळून जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भवानी मातेसमोर आपली श्रद्धा व्यक्त करावी आणि या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.













