Thu, Jan 15, 2026
यशोगाथा

भुईंजच्या रेवा तांबोळीची थेट ‘इस्रो’मध्ये झेप; सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड!

भुईंजच्या रेवा तांबोळीची थेट ‘इस्रो’मध्ये झेप; सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 13, 2025

सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील रेवा तांबोळीने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर एक मोठी झेप घेतली आहे. कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या रेवाची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रतिष्ठित इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. चंद्रयान आणि मंगळयानासारख्या मोहिमांचे प्रक्षेपण करणाऱ्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये तिला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली असून, तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

भुईंज येथील रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिची आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था तथा इस्रो मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

इस्रो मध्ये प्रशिक्षणासाठी संधी मिळावी यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. गुणवत्तेच्या अत्यंत काटेकोर कसोटीवर त्यातील निवडक विद्यार्थ्यांना ही संधी मिळते.

या पार्श्वभूमीवर चंद्रयान, मंगळयान अशी भारताचे बहुतेक रॉकेट्स आणि उपग्रह जेथून प्रक्षेपित होतात त्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (इस्रो) मध्ये रेवाची इंटर्नशिपसाठी झालेली निवड विशेष बाब मानली जात आहे.

रेवा कोल्हापूर येथील केआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स (स्पेशलायजेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. यासोबतच ती डेटा सायन्समध्ये ऑनर्स करीत आहे.

दोन महिन्यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या गुगल हॅकेथॉनमध्ये देखील रेवाची निवड झाली होती. त्या ठिकाणी तिने टेक्निकल टीममध्ये महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

तत्पूर्वी कोलकत्ता येथील जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या प्रख्यात संस्थेच्या विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झाली होती.

गेल्या तीन वर्षात अभ्यासक्रमाशी निगडीत विविध विषयावरील तीन रिसर्च पेपर तिचे प्रकाशित झाले असून चौथा रिसर्च पेपर लवकरच प्रकाशित होईल. त्यासोबत विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये तिने यशस्वी कामगिरी केली आहे.

सातारा येथील कुपर कंपनीमध्ये देखील तीने नुकत्याच केलेल्या इंटर्नशिप कालावधीत सोपवलेला प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

केआयटी कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या सेक्रेटरीपदी देखील तिची निवड झाली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजनात तिने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवत आहे.

शैक्षणिक गुणवत्तेत देखील तिने उत्तम कामगिरी करत 9.5 सिजिपीए प्राप्त केला असून या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!