नारायण महाराजांचे विचार आचरणात आणल्यास जीवनाचे सार्थक : बाळासाहेब सोळस्कर
![]()
भुईंज येथे सद्गुरू नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप; टेंबे स्वामी महाराज, मदनदादा भोसले यांची प्रमुख उपस्थिती.
भुईंज : श्री. क्षेत्र नारायणपूर व सद्गुरू नारायण महाराजांनी सातारा जिल्हयासह संपूर्ण देशभरात केलेले अलौकिक कार्य हे माणूस घडवणारे लोककार्य असून त्यांच्या विचाराने जात राहिल्यास ख-या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनात मुख समाधान अनुभवायला मिळेल हेच खरे अद्यात्मातील मर्म आहे असे प्रतिपादन जेष्ठ नेते बाळासाहेब सोळस्कर पाटील यांनी केले.
श्री क्षेत्र भुईंज येथे आचार्य भृगुऋषी मठात लोकसंत सद्गुरू नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यान मालेच्या बाराव्या व्याख्यान व समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ नेते बाळासाहेब सोळस्कर पाटील बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार मदनदादा भोसले होते. तर प्रमुख उपस्थिती श्री क्षेत्र नारायणपूर संस्थानचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, व्यवस्थापक भरतानाना क्षीरसागर, उद्योगपती रामभाऊ वारागडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब सोळस्कर पाटील पुढे म्हणाले की, लोकसंत सदगुरू नारायण महाराजांनी गंडे दोरे न देता सदविचारांची व चांगल्या आचरणाची पेरणी केली. त्यामुळे आज चार दशकांच्या प्रवासानंतर भुईंज, सोळशी, बामणोली विनायकनगर ही तिर्थक्षेत्र घडवण्यात आपणास यश मिळाले. समाजातील व्यसनाधिनता, दुरावलेले कौटुंबिक संबंध यांच्यावर संस्कार करत कुंटुबे सुरळीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या आचार आणि विचारातून यापुढच्या पिढया घडाव्यात एवढे मोठे अलौकिक कार्य केले आहे. त्यांच्या विचाराने यापुढे जावू या असे आवाहन करून त्यांनी सद्गुरूंचे अनेक दाखले दिले
तर अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार मदनदादा भोसले म्हणाले की सद्गुरू आण्णा महाराजांनी आपणास वेळोवेळी दिलेले दाखले व कृतीतून उभारलेले आदर्श जपूया तिर्थक्षेत्र भुईंज व आचार्य मृगूऋशी मठाचे पावित्र्य वाढवूया असे हि ते म्हणाले.
प्रारंभी श्री क्षेत्र नारायणपूर संस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी अनेक प्रासंगिक उदाहरणे देत विचारांचा जागर केला तर टेंबेस्वामी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संदेश दिला. कार्यक्रमास राज्यभरातील शिष्यगण विविध पक्षांचे व संस्थानचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने हजर होते.
स्वागत सरपंच विजय वेळे उपसरपंच शुभम पवार आदींनी केले प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघाचे प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी केले तर आभार संजय शिंदे यांनी मानले सुत्र संचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तसेवेकरी मंडळ, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, प्रेस क्लब, जेष्ठ नागरिक संघ, सद्गुरू आण्णांच्या लेकी गुप व ग्रामस्थ भुईंज यांनी परिश्रम घेतले –
फोटो ओळी : भुईंज येथील नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यान मालेच्या समारोप प्रसंगी श्री. टेंबेस्वामी महाराज, भरतनाना क्षीरसागर, बाळासाहेब सोळस्कर पाटील, मदनदादा भोसले पत्रकार जयवंत पिसाळ व इतर मान्यवर













