देगाव ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम: सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे ग्रामीण सुरक्षिततेला बळकटी
![]()
भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गर्जे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री. सोमनाथ पवार, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना संचालक श्री. रामदास इथापे, यांच्या हस्ते या अत्याधुनिक सुरक्षा सुविधेचे लोकार्पण

वाई : दिनांक 30 : ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असताना, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण आणि आदर्शवत पाऊल उचलले आहे. गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू करण्यात आला आहे. भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गर्जे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री. सोमनाथ पवार यांच्या हस्ते या अत्याधुनिक सुरक्षा सुविधेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून देगावमध्ये घरगुती वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि शालेय परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही काळाची गरज बनली होती. या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, श्री. सोमनाथ पवार यांच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्यात आली.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय पुढाकाराने गावातील महत्त्वाचे चौक, शाळा परिसर आणि संवेदनशील अशा २८ ठिकाणी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे देगाव गाव सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेले असून, ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक बळकट होईल, असे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. या लोकार्पण सोहळ्याला भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गर्जे, श्री. सोमनाथ पवार, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना संचालक श्री. रामदास इथापे, सरपंच श्री. सुरज पिसाळ, उपसरपंच श्री. किरण इथापे, माजी उपसरपंच श्री. प्रकाश इथापे, देगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सदाशिव इथापे, व्हा. चेअरमन श्री. गणेश सोनवलकर, सदस्य श्री. अजिंक्य इथापे, मकरंद पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजयराव इथापे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव इथापे यांच्यासह देगाव गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













