Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम  मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedAugust 25, 2025

सातारा दि. 25: अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामांना गती द्यावी व सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत म्हणजेच 26 मार्च 2026 पर्यंत व कराड- चिपळूण मार्ग येत्या डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावा.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन्ही रस्त्यांच्या करण्यात येणाऱ्या कामाचा दर 15 दिवसाला बारचार्ट सादर करावा. सादर केलेल्या बारचार्ट नुसार काम न झाल्यास अथवा कामामध्ये दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कारवाई करणार, प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

सातारा येथील पालकमंत्री कार्यालयात सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण महामार्गाच्या कामाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला.  या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता राजेश शेलार, प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संताष रोकडे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता श्रुती नाईक आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील सातारा-कोल्हापूर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. तर कराड चिपळूण रस्ताही चार वर्षांहून अधिक काळ रखडलेला आहे.  हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्वाचे असून गणपती उत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हे रस्ते अत्यंत महत्वाचे आहेत. तथापि या रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने सुरु असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन पालकमंत्री श्री. देसाई यांनी या रस्त्यांच्या कामासंदर्भात दर 15 दिवसाला बारचार्ट सादर करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा-कोल्हापूर रस्त्याच्या पूर्णत्वाची मुदत वाढवून मार्च 2026 केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत रस्त्यावरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोंबरपर्यंत कराड येथील उड्डाणपुलावील एका बाजुचे काम पूर्ण होऊन ही बाजु वाहतुकीसाठी सुरु होईल, असे सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील बाजु ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही अथवा कामामध्ये दिरंगाई झाल्यास यामध्ये प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल, असे बजावले. गुहाघर- पाटण रस्ता 61 कि.मी.चा असून या पैकी संगमनगर धक्का घाट माथ्यापर्यंतच्या 13 कि.मी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, ते त्वरीत भरुन घेतले जावे, असेही निर्देश दिले. यावेळी पाटण शहरातील रस्ते त्यावरील अतिक्रमणे याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!