वाई रोटरी क्लबतर्फे पुणे येथे कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न
वाई : रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे रोटरी आशा एक्सप्रेस ही कॅन्सर निदानासाठी वापरली जाणारी कॅन्सर स्क्रिनिंग आणि अवेअरनेस बस पुणे येथे नेऊन तिच्या माध्यमातून मिलिटरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (सीएमई) पुणे येथे वैद्यकीय शिबिरामध्ये विशेष “कॅन्सर तपासणी शिबिर” घेण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वाई या शिबिराचे सहआयोजक होते. शिबिरामध्ये गर्भाशय व अन्य स्त्रीजननमार्ग अवयवांचे कॅन्सर, कान-नाक-घशाचे कॅन्सर, मुखाचे कॅन्सर आणि वक्षाचे कॅन्सर अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या संदर्भात तपासण्या करण्यात आल्या.
कमांडर सोनल रजपूत, डॉक्टर सोनल सिंग,डॉक्टर रोशनी मिल्ट्री ची डॉक्टर, रोटरी आशा एक्सप्रेस बसच्या इन्चार्ज डॉ. वैशाली मोहिते तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील डॉक्टरांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी एकूण ६७८ व्यक्तींची या बसच्या माध्यमातून कॅन्सर निदानासाठी तपासणी केली. सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय आणि संबंधितांनी या शिबिराचा लाभ घेतला. “आम्हाला वाई रोटरीच्या माध्यमातून सैनिकांची सेवा करायची संधी मिळाली याचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो.” असे उद्गार रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी या प्रसंगी काढले.
या शिबिरप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे रो. कुणाल शहा, श्रेयस शहा, रो. नीला कुलकर्णी, रो. मदन पोरे आणि अंजली पोरे उपस्थित होते.
शिबिराला सैनिक व कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.













