महसूल प्रशासनाची सतर्कता आपत्तीच्या परिस्थितीत नवऱ्याला शोधायला बाहेर पडलेल्या आजींना दिला दिलासा..
सातारा दि. 20- तारळी धरण परिसरात पाणी पातळी पाहणी व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी तोंडोशी ग्राम महसूल अधिकारी, मोहिनी शिंदे, तोंडोशी पोलीस पाटील किरण सपकाळ आवर्डे मंडळाधिकारी किशोर वाडकर, गेले असता त्यांना एक आजी लाल प्लॅस्टिकच्या कागदाची खोळ पांघरून पुलाच्या दिशेने जाताना दिसल्या, गाडीचा हॉर्न देऊन आज्जीना थांबवलं, त्यांची ओळख करून दिली व पुलाकडे जाऊ नका पाणी वाढलं आहे असे सांगितले. पण अचानक आज्जींच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला सुरवात झाली, त्यांनी आजींना धीर देत आज्जी रडू नका काय झालं ते सांगा आम्ही तुमची अडचण दुर करू, आम्ही त्यासाठीच भागात आलो आहोत. प्रथम दर्शनी तिघांना वाटले की आजी आजी गुरांना वगैरे चरण्यासाठी घेऊन आल्या असतील व एखादं जनावर हरवल असेल म्हणून त्या रडत असतील. पण नंतर आज्जीने रडत रडत सांगितलं की त्यांचा नवरा सकाळी 10 ला घराबाहेर गेला आहे ते आत्ता 3 वाजले तरी आले नाहीत आज्जीकडे पण फोन नाही आणि त्यांच्याकडे पण नाही. कुठं असतील, कसं असतील, काय माहीत…
आज्जी म्हणे की “बँकेत पैसं आल्यात तेचं काढाय पुस्तक घेऊन बँकेत गेल्यात त्यांना म्हनलं तिकडं फिरु नका घरी येऊन करा काय करायचं ते पण म्हातारं ऐकत नाही” असं म्हणून पुन्हा त्या रडायला लागल्या. त्यांनी आज्जीना धीर देऊन घरी पाठवलं व बाबांना शोधून आणून घरी सोडेल असे विश्वासाने सांगितलं व पोलिस पाटील मुरूड गावी आलो तिथे त्यांच्याबद्दल चौकशी केली सकाळ पासून कोणी पाहिलं का याबाबत विचारपूस केली पण फारशी उपयोगी माहिती भेटली नाही. त्यानंतर बाबांच्या भावाला तोंडोशी मधून बोलवून घेतलं व पोलिस पाटील आणि त्यांचे बंधू यांना बाबांना शोधण्यासाठी पाठवलं. त्यांना ते हरवलेले बाबा तारळी धरणच्या पुलाजवळ पडलेले आढळले. तोंडोशी गावाचे पोलिस पाटील यांनी त्यांना घरी नेऊन आज्जी जवळ सुखरूप सोडले.
” जनहिताय सर्वदा ” म्हणजे कदाचित हेच असावं… त्या बाबांसाठी कदाचित हे नेहमीचंच असावं… पण आज पाऊस वाढला आहे, नदीचं पाणी वाढलं आहे या भीतीने त्या आज्जींच्या डोळ्याला लागलेली पाण्याची धार… काय करावं कोणाला सांगाव हे त्यांना सुचत नव्हतं आम्हाला तिथे पाहून त्यांचा धीर सुटला व त्यांनी रडत रडत आपली भीती सांगितली… संध्याकाळी 6 वाजता धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली, कदाचित यावेळी पाणी पातळी वाढून आजोबा जिथं पडले होते तिथवर आली असती.. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आज एक अघटीत प्रसंग टळल्याचे चांगले उदाहरण पहायला मिळाले.













