स्वातंत्र्य दिनी देगावमध्ये सामाजिक कृतज्ञतेचा जागर
![]()
स्वातंत्र्य दिनी गुणवंतांचा गौरव आणि शाळेला मदत, अग्निशमन दल आणि सैन्य दलातील जवानांच्या हस्ते देगावमध्ये ध्वजारोहण
वाई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देगाव (ता. वाई ) येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीने गावातील वातावरण चैतन्यमय झाले.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभ पुणे येथे अग्निशमन दलात कार्यरत असलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले गावचे सुपुत्र श्री. योगेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच, देगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड येथील ध्वजारोहण सैन्य दलात कार्यरत असलेले श्री. अभिजीत शिवाजी इथापे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही ठिकाणी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत आणि स्फूर्ती गीतांचे गायन झाले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सोमनाथ पवार व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाला चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले. या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करणारे श्री. चेतन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील कात्रज येथे एका चार वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचवणारे श्री. योगेश चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच, ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पोस्टमन श्री. शिवाजी इथापे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

अंगणवाडी क्रमांक ५९ व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉ. अनुराधा इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण देगावचे सुपुत्र श्री. वसंत निवृत्ती खंकाळ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गात प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या बक्षिसांसाठी सौ. रुपाली विजयराव इथापे यांनी सौजन्य दिले. शाळेच्या विकासातही ग्रामस्थांनी मोलाचा वाटा उचलला. श्री. वसंत खंकाळ यांनी त्यांच्या आई, तानूबाई निवृत्ती खंकाळ यांच्या स्मरणार्थ शाळेच्या दोन खोल्यांना फरशी बसवून दिली. तसेच उपसरपंच श्री. किरण इथापे आणि माजी उपसरपंच श्री. प्रकाश इथापे यांनीही प्रत्येकी एका खोलीसाठी फरशी बसवून दिली. या दानशूर व्यक्तींचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या खोल्यांचे उद्घाटन झाले.

सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.













