Fri, Apr 17, 2026
सामाजिक

सातारा सिव्हिल रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागास रोटरीचे जीवनदायी योगदान

सातारा सिव्हिल रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागास रोटरीचे जीवनदायी योगदान
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2025

सातारा : रोटरी क्लब ऑफ वाई , रोटरी क्लब ऑफ वेलबीईंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने, रोटरी फाउंडेशनच्या मदतीने, सातारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग सक्षम करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ वेल बीईंग या प्रकल्पाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील वाढत्या प्रसूती संख्येसोबत वाढणाऱ्या नवजात बाळांच्या जटिल आरोग्य समस्यांवर तातडीने उपाय देणे, आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना आधुनिक व मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.

या प्रकल्पात रोटरी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर्स, वॉर्मर्स, फोटोथेरपी युनिट्स, मॉनिटर्स, इन्क्युबेटर्स व इन्फ्युजन पंप्स उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे या विभागाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली असून, पूर्वी जिल्ह्याबाहेर पाठवली जाणारी बाळे आता साताऱ्यातच उपचार घेत आहेत.

या NICU प्रकल्पाचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशश्री नागराजन यांच्या हस्ते, रोटरी प्रांतपाल रो. सुधीर लातूरे, माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ आणि डॉ. ओमप्रकाश मोतीपावले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमात अनेक रोटेरियन, आरोग्य अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी यशश्री नागराजन यांनी आपल्या भाषणात सांगितले, “रोटरी केवळ सुविधा देत नाही, तर त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. ही त्यांची खरी ताकद आहे. रोटरी क्लब ऑफ वाईने शासकीय रुग्णालयात नवजात शिशु अती दक्षता विभागाची उभारणी करून हजारो बालकांना जीवदान देण्याची सुविधा उपलब्ध करून देवून महत्वाची भूमिका बजावली आहे. रोटरीच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या या उपक्रमाने आरोग्य क्षेत्रात सेवा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

प्रांतपाल सुधीर लातूरे म्हणाले की, रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून रोटेरियन जीव वाचवण्याची जादू घडवू शकतात. रोटरीचा “मातृ व बाल आरोग्य” हा फोकस एरिया प्रत्यक्षात उतरवण्यात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरतो आहे.

सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपे यांनी सांगितले की, रोटरीकडून नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी दिले गेलेले हे एक मोलाचे योगदान आहे या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा गरजूंना करून देण्यात येईल.

प्रकल्प प्रमुख स्वाती हेरकळ यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी, गरज, आणि रोटरीची भूमिका विषद केली. त्यांनी सांगितले, “ही केवळ वैद्यकीय सुविधा नव्हे, तर नवजात बाळांच्या आयुष्यातील जीवनदायी संधी आहे. रोटेरियन म्हणून हे कार्य करताना आम्हां सर्वांना समाधान व अभिमान वाटतो.”

सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि स्टाफ यांचे सहकार्य यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होवू शकला.

प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात रो. प्रमोद शिंदे, डॉ. मनोहर दातार, रो. मदन पोरे, डॉ. जितेंद्र पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष रो. कुणाल शाह यांनी स्वागत केले तर सचिव अनुपम गांधी यांनी आभार मानले.

एक हृदयस्पर्शी क्षण – स्वार्थ विरहित सेवेचे खरे मूर्त स्वरूप
या प्रकल्पाच्या उद्घाटनास अवघे दोनच दिवस शिल्लक होते…
तेवढ्यात एका अत्यंत गंभीर अवस्थेतील नवजात बाळाला NICU मध्ये दाखल करण्यात आलं.

रुग्णालयातून बालआरोग्य तज्ञ डॉ. झेंडे यांचेकडून एक विंनती आली —
“हे नवीन मशीन वापरायला परवानगी आहे का?”
रोटरी क्लब ऑफ वाईच्या प्रतिसादात क्षणाचाही विलंब झाला नाही “हो! जर या यंत्रामुळे बाळ वाचणार असेल, तर तात्काळ वापरा!”
आणि जे घडलं, ते सर्वांच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं…
दुसऱ्या दिवशी, जेव्हा रोटरी क्लब ऑफ वाईचे सदस्य सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले,
तेव्हा नविन सर्व १० वॉर्मर्समध्ये नवजात बालके उपचार घेत होती.
ते दृश्य पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यांत पाणी आलं…
ही होती अश्रूंची भाषा — समाधानाचे, सेवाभावाचे आणि ‘रोटरी’चे खरे अनुभवलेले क्षण.
हीच असते खरी स्वार्थ विरहित सेवा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!