Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

भारतीय परंपरेचा स्वीकार आणि वैचारिक क्रांती हाच टिळकांचा खरा वारसा – डॉ. रवींद्र शोभणे

भारतीय परंपरेचा स्वीकार आणि वैचारिक क्रांती हाच टिळकांचा खरा वारसा – डॉ. रवींद्र शोभणे
Ashok Ithape
  • PublishedAugust 4, 2025

वाई ता.२:- लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या मतानुसार इंग्रजांनी भारतीयांच्या कार्यात कधीही हस्तक्षेप करू नये. टिळक सश्रद्ध होते. भारतीय परंपरेतील चांगल्या गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते, असे विचार ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी येथे मांडले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने आयोजित केलेल्या टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात “लो.टिळक :- काळ आणि कर्तृत्व ” या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक ,प्राज्ञपाठशाळेचे सहकार्यवाह व टिळक वाङ्मयाचे अभ्यासक भालचंद्र मोने होते.

डॉ. शोभणे म्हणाले, टिळकांनी बरेचसे लेखन इंग्रजीमध्ये केले असून ते वैशिष्ठ्य स्वरूपाचे होते. ” गीता रहस्य ” या माध्यमातून लोकमान्यांनी सांगितलेला कर्मवाद हा प्रत्येक काळास लागू पडतो. त्यांच्या मते सर्वसामान्य माणसाला त्याच्या कार्याची व कर्माची ओळख करून देणे हा मुख्य हेतू होता, असे सांगून डॉ. शोभणे म्हणाले, भारतीय परंपरेतील वेगळा संदर्भ टिळकांनी मराठी जनतेस सम‌जावून सांगितला. ते स्वतः निशस्त्र क्रांतीच्या विचाराचे होते. परंतू त्यांनी आपली मते वैचारिक क्रांती व्दारे इंग्रजांना पटवून दिली. एकाच काळात सश्रद्ध असणारे लो.टिळक व बुद्धिप्रामाण्यवादी असणारे गोपाळ गणेश आगरकर यांचे अनेक ठिकाणी मतभेद होते. परंतू त्यांचे मनभेद नव्हते असेही डॉ. शोभणे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. मोने यांनी लो. टिळक आणि वाईकर यांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. लोकमान्याच्या ‘ गीता रहस्य ‘ यावर टीका करणारे भाऊशास्त्री लेले होते. तरीपण लेले यांना लोकमान्यांच्या कार्याविषयी प्रचंड आदर होता. तीच बाब बापूजी मार्तड आंबेकर यांच्याही बाबतीत घडली होती. वाईत टिळकांच्या विचारांचा प्रभाव असणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक असून या स्वातंत्र्य सैनिकांची नाव देखीचे स्पष्ट कमी केली.

विश्वस्त अनिल जोशी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी शोभणे यांचा तर सहकार्यवाह माया अभ्यंकर यांनी मोने यांचे स्वागत केले. कार्यवाह भद्रेश भाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सौ स्वाती महाकाळ, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, शरद चव्हाण , मदनकुमार साळवेकर, सौ माया अभ्यंकर, आनंद शेलार, डॉ शिवाजी कदम ,जगतानंद भटकर, डॉ.प्रशांत पोळ, विश्वनाथ पावगी या मान्यवरांसह वाईकर रसिक श्रोते उपस्थित होते.

फोटो खालील ओळी:- लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना डॉ. रवींद्र शोभणे, त्यावेळी दत्ता मर्ढेकर, भालचंद्र मोने, अनिल जोशी, भद्रेश भाटे. फोटो :- विनोद सोहनी वाई)

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!