वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26: ‘गाव माझी जबाबदारी’ उपक्रमाचा शानदार शुभारंभ
![]()
गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन; स्वच्छता अभियानाला नवी दिशा.
वाई : वाई पंचायत समितीच्या वतीने आयोजित ‘वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-2026’ अंतर्गत ‘गाव माझी जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचा आज गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मा. रुपाली विजयकुमार परीट, राहुल हजारे ( विस्तार अधिकारी ) रोहित जाधव (तालुका समन्वयक ) कुणाल दीक्षित (कनिष्ठ सहाय्य ) यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे वाई तालुक्यातील स्वच्छतेच्या चळवळीला एक नवी दिशा मिळणार असून, प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
गाव माझी जबाबदारी’ हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, ती एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गावांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक ग्रामस्थाला आपल्या गावाच्या स्वच्छतेची वैयक्तिक जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. आपले गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ ग्रामपंचायतीची किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.” त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण होऊन, त्यातून एक निरोगी आणि सुंदर समाज घडेल अशी आशा व्यक्त केली.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत स्वच्छ भारत मिशन, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान , स्वच्छता हि सेवा तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचाविणे करिता वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणे मैला गाळ व्यवस्थापन करणे, कचरा वर्गीकरण करणे आणि गावातील परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत चांगल्या सवयी लागणे करिता हे अभियान दर वर्षी राबविले जातात.
वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती कचरा व प्रदूषण मुक्त होणे करिता जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती वाई यांच्या सयुंक्त विद्यमानाने गतवर्षी प्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली व वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांचे संकल्पनेतून या वर्षी वाई विकास गटातील सर्व ग्रामपंचायती मध्ये वाई स्वच्छता चषक स्पर्धे अंतर्गत या अभियान कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
वाई तालुक्यातील जि.प.गट निहाय हि स्पर्धा घेण्यात येणार आहे . या स्पर्धेमध्ये सर्व ग्रामपंचायतीं भाग घेणार असून तालुकास्तरीय नेमण्यात आलेल्या कमिटी मार्फत सर्व ग्रामपंचायतीची तपासणी होणार असून चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीमधून प्रत्येक जि.प.गटातून तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. या सर्व निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायती मधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीची निवड हि जिल्हास्तरित कमिटी मार्फत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशा गुणांकना नुसार निवड करून त्यांना पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती वाई यांचे मार्फत बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.













