इनरव्हील क्लब वाईचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
![]()
अध्यक्षपदी रुपाली मोरे, सचिवपदी पिंकी जैन, गरजू मुलींसाठी उल्लेखनीय उपक्रम राबवण्याचा संकल्प

वाई l प्रतिनिधी : इनरव्हील क्लब वाईचा 2025-26 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि सामाजिक जाणिवांनी युक्त अशा वातावरणात श्री यश हॉटेल वाई येथील सभागृहात पार पडला. या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्षपदी रुपाली मोरे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून PDC रोहिणी वैद्य आणि डिस्ट्रिक्ट एडिटर स्वाती बिरामणे उपस्थित होत्या. याशिवाय महाबळेश्वर-पाचगणी येथील इनरव्हील क्लब पदाधिकारी व क्लबच्या सर्व सदस्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला चारचाँद लावले.
पदग्रहणाच्या औचित्याने इनरव्हील क्लब वाईच्या वतीने दोन समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. वाई पश्चिम भागातील “जोर” या ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील, शिक्षणाची ओढ असलेल्या चार मुलींना पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण व राहण्याची व्यवस्था करून दिली गेली. या उपक्रमासाठी सेक्रेटरी पिंकी जैन यांनी भरीव मदत दिली, तर चार्टर प्रेसिडेंट रेखा चिरगुटे यांनी मोफत प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
या मुलींना शालेय शिक्षणासाठी आवश्यक त्या साहित्याचा व गणवेशाचा संपूर्ण खर्च विभा जैन यांच्या वतीने करण्यात आला. या उपक्रमामुळे या होतकरू मुलींना नवीन संधी मिळाल्या असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचे कार्य घडले. महाबळेश्वर इनरव्हील क्लबचे अध्यक्ष वर्षा पार्टे यांनी दहा हजार रुपये पुढील सामाजिक उपक्रमासाठी मदत जाहीर केली.
या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्षा रुपाली मोरे यांनी संकल्प व्यक्त केला की, “या वर्षभरात क्लबच्या माध्यमातून शिक्षण गरजू विद्यार्थ्यांना मदत, आश्रम संस्था सहाय्य, सायबर सुरक्षा व पोक्सो कायद्याबाबत जनजागृती, रस्ता सुरक्षा मोहिमा, आरोग्य शिबिरे इ. असे अनेक उपक्रम हाती घेतले जातील.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकर्षक पद्धतीने तेजल सावंत यांनी केले व उपस्थित सर्व सदस्यांनी या सामाजिक बांधिलकीने युक्त कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
समाजासाठी व सकारात्मकतेसाठी प्रेरणादायक पाऊल उचलणारा हा कार्यक्रम ‘इनरव्हील क्लब वाई’ च्या सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
—













