एआय तंत्रज्ञानाने फुलला मळा, तेथे रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळा
वाई, दि. २० : एआय तंत्रज्ञानाने फुलला डाळिंब,पेरू,ऊस शेतीचा मळा, तिथे माजी विद्यार्थ्यांचा भरला स्नेहमेळा!
साताऱ्यातील महात्मा फुले अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षानंतर एकत्र येत सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथील डॉ.युगंधर सरकाळे, विजय सरकाळे यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित प्रयोगशील शेती, फळबागेस भेट देत माहिती घेतली.
एआय तंत्रज्ञानाने शेतीतील कष्टाची,पाण्याची, उत्पादन खर्चाची बचत होण्याबरोबरच; तंत्रज्ञान एकरी उत्पादन वाढविणारे, पर्यावरण टिकविणारे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी यावेळी केले.
एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, विषमुक्त शेती, मजुरांच्या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास श्री.भोसले यांनी प्रा.संपत यादव, संजय घोरपडे, विष्णू जगताप, प्रा.विजय पोळ संजय यादव, संभाजी क्षीरसागर, संजय माने, प्रदीप गोरे, बंडोबा ढाणे यांच्याशी चर्चेदरम्यान व्यक्त केला.
शिवार भेटीत शब्बीर मुजावर, सुभाष पवार,अनिल हिंगमिरे , जालिंदर गोरे, अजित जगदाळे, शिवलाल गावडे, गणपत सस्ते, संजय घोरपडे, नामदेव धनावडे सहभागी होते.
यावेळी ‘ एआय विथ प्रिसिजन फार्मिंग ‘ विषयी माहिती देताना श्री.भोसले यांनी गरजेइतक्याच कमी पाण्यावर भगवा डाळिंब रोपांची एकसमान वाढ, एकरी उत्पादन, फळांचा एकसमान आकार, दर्जा, लवकर फळधारणा यासंबंधीची माहिती स्वयंचलित तंत्रज्ञानाने एकत्रित करून, ती बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राकडे पाठविली जात असल्याचे सांगितले. त्या माहितीचे विश्लेषण करून फळबागेसाठी हवामान, पाऊस व पाण्याची गरज, कीड, रोगांचे उगमस्थान व नियंत्रण, वापरावयाची प्रतिजैविके, प्रतिबंधक उपाय, गरज तेव्हाच सेंद्रिय खते देण्यामुळे भांडवली खर्चातील बचत यांची माहिती शेतकऱ्याला मोबाईलद्वारे मिळते. त्यामुळे किडींचे सुरुवातीसच नियंत्रण व समूळ उच्चाटन करणे शक्य होते, असे स्पष्ट केले. कीटकनाशकांचा वापर नसल्याने मधमाशांची पैदास वाढून फळांचे, पिकांचे एकरी उत्पादन वाढते,पर्यावरणाचे जतन, संवर्धन होते. ऊस हे पर्यावरण संवर्धन करणारे महत्त्वाचे पीक असून; ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञान खूपच फायदेशीर असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.
वर्गमित्रांनी रेड जार्वी पेरू बागेसही भेट दिली. बळवंत सरकाळे, दादासाहेब सरकाळे, जयवंत कदम यांनी क्षेत्र भेटीचे नियोजन केले. जयवंत कणसे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन, शिवाजी राजापुरे यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळी: एआय तंत्रज्ञान आधारित डाळिंब बागेची माहिती देताना अमृत भोसले. समोर प्रा. संपत यादव, गणपत सस्ते, जयवंत कदम, संजय माने, संजय यादव, बंडोबा ढाणे, संजय घोरपडे आदी













