Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता

खरीप व रब्बी हंगामातील पीकस्पर्धा जाहीर

खरीप व रब्बी हंगामातील पीकस्पर्धा जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJuly 9, 2025

सातारा दि. 9 :  : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२५-२६ साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील १६ पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मूग व उडीद पिकासाठी स्पर्धेत ३१ जुलै पर्यंत तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सहभाग घेता येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप ११ व रब्बी हंगामातील ५ अशा एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश असून त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुकापातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पीकस्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!