प्राज्ञ पाठशाळा मंडळ म्हणजे कृष्णाकाठचे तीर्थस्थळच
![]()
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचे वाईतील सदिच्छा भेटीदरम्यान गौरवोद्गार
वाई / प्रतिनिधी : येथील कृष्णाकाठावर साकारलेल्या प्राज्ञ पाठशाळा मंडळामध्ये सुरू असणारे काम हे अतुलनीय असून या संस्थेने जतन केलेल्या साडेदहा हजार संस्कृतमधील पोथ्यांचा संग्रह हे या संस्थेचे फार मोठे वैचारिक धन आहे. या संस्कृत पोथ्यांच्या आधारे प्राज्ञ पाठशाळा मंडळ मीमांसाकोष व धर्मकोश या कोशांची निर्मिती करते. हा भाग देखील प्रशंसनीय असाच आहे. यामध्ये संस्थेचे संस्थापक स्वामी केवलानंद सरस्वती व त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे फार मोठे योगदान असून त्यांच्या या वंदनीय कामाबद्दल मला फार आदर वाटतो.” असे मत राज्यसभेच्या सदस्या खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केले.
संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ देउन सन्मान केला आणि संस्थेच्या वाटचालीची माहिती सांगितली. त्यामध्ये भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पां. वा. काणे व पद्मविभूषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा प्रामुख्याने सक्रीय सहभाग आहे. त्याचप्रमाणे या संस्थेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, उपराष्ट्रपती गोपाळस्वरूप पाठक, उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती व उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी भेटी दिल्या असून संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या कामाची त्यांनी प्रशंसा केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या संस्थेमध्ये जतन केलेला प्रचंड ग्रंथ संग्रह व कोश वाङ्मय या बाबी बहुमोल स्वरूपाच्या असून येथील ज्ञानपरंपरा म्हणजे नवनवीन ज्ञानसंपदेची निर्मिती व प्रसार, प्रचार होय. त्या दृष्टीनेवाईचे प्राज्ञपाठशाळामंडळ म्हणजे तीर्थस्थळ आहे,” असेही खासदार कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
संस्थेने आपल्या वाटचालीची शंभर वर्षे पूर्ण केली असून ही संस्था पूर्णतः लोकाश्रयावर सुरू असल्याचे मत संस्थेचे सहसचिव भालचंद्र मोने यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेमध्ये घडत असलेल्या या ज्ञानसंचयाबद्दल आदर व्यक्त करून खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या आपणांस आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहाय्य मी स्वतःहून देण्यास तयार आहे, असे यावेळी त्यांनी सूचित केले.
यावेळी संस्थेचे सचिव अनिल जोशी, सहसचिव भालचंद्र मोने, पत्रकार भद्रेश भाटे व आदित्य चौंडे उपस्थित होते.













