Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित

“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित
Ashok Ithape
  • PublishedJune 17, 2025

सातारा दि. 17 जून 2025 : आज दुपारी 12 वाजता सातारा शहरातील ऐतिहासिक जलमंदिर येथे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे लिखित “यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” या प्रेरणादायी आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती श्री. उदयनराजे भोसले महाराज यांच्या शुभहस्ते अत्यंत दिमाखात आणि उत्साहात पार पडले.

या प्रसंगी शहरातील साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा केवळ एक प्रकाशन सोहळा नव्हता, तर नव्या युगाला दिशा देणारा सामाजिक संदेश देणारा एक ऐतिहासिक क्षण होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयं लेखक डॉ. विजय तनपुरे होते. हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, त्यातील १३ यशमूल्यांवर ‘शिवतंत्र’ ही विचारसरणी उभी करण्यात आली आहे. या विचारांचे मूळ उद्दिष्ट म्हणजे – कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडून, स्वबळावर यशस्वी होण्याचा मार्ग समाजाला दाखवणे.

या प्रसंगी बोलताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नसून नव्या पिढीला यशस्वी होण्यासाठी दिशा देणारे आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी, आत्मभान आणि निर्णयक्षमता शिकवली आहे. हे पुस्तक वाचून कोणताही युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. समाजात अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी पुस्तके चळवळ बनली पाहिजेत.”

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे हे एक अपंग व्यक्तिमत्व असूनही त्यांनी आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशात पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्र पसरवले आहे. २००१ मध्ये झालेल्या मोठ्या वैयक्तिक नुकसानानंतर त्यांनी स्वतःला उभं करून पुन्हा आयुष्य घडवले. गेली २६ महिने त्यांनी सतत वर्कआउट करून स्वतःचं आरोग्य सुधारणे, समाजसेवा करणे आणि “शिवतंत्र” या विचाराच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनवण्याचे कार्य सुरू केले आहे.

‘शिवतंत्र’ संकल्पनेवर आधारित सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. शिवाश्रम या अपंगांसाठी उभारलेल्या त्यांच्या सेवाभावी केंद्राची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
“हे पुस्तक माझ्या आयुष्याचा अनुभव आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी मी स्वतःला पुन्हा घडवलं. तेच विचार मी आता समाजात पोहोचवत आहे. हे पुस्तक प्रत्येक शाळा, महाविद्यालय, तरुण उद्योजक, बेरोजगार युवक, अपंग बांधव आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोकांसाठी नवा प्रकाश देईल,” असे लेखक डॉ. तनपुरे यांनी सांगितले.
प्रकाशन सोहळ्याचे निवडक क्षणचित्रे, शिवकालीन सादरीकरण आणि उपस्थित मान्यवरांचे अभिप्राय यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी झाले.
या पुस्तकाच्या माध्यमातून फक्त वैयक्तिक यश मिळवण्याचा मार्ग नाही, तर समाजाचा पुनरुज्जीवन घडवण्याचा एक व्यापक विचार मांडण्यात आला आहे. ‘शिवतंत्र’ ही संकल्पना शिवाजी महाराजांच्या विचारांची आधुनिक काळातील पुनर्मांडणी असून, ती नव्या भारतासाठी एक प्रभावी दिशा देऊ शकते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!