Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार
Ashok Ithape
  • PublishedJune 11, 2025

सातारा दि. 11: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा आहे. मराठ्याचा इतिहास आणि त्याशी संबंधित जिल्ह्यात ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ असणारी अनेक ठिकाणे आहेत. याला जगासमोर आणून त्याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग व्हावा यासाठी आरखडे तयार करावेत. शाहुपरी येथील फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रकल्पाचा आढावा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ शेलार यांनी घेतला. या बैठकीला आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ शेलार म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे त्यांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी. सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी यासाठी जिल्ह्यातील सिनेमा व नाट्य गृहे, ग्रामीण भागात सांस्कृतिक सभागृह यांच्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
जिल्ह्यातील लोककला, लोक संगीत, लोक वाद्य यांचे जनत व्हावे यादृष्टीने मॅपींग करावे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मोठ्या प्रमाणात व्यापाला आहे. या ठिकाणी बाहेरुन वाघ आणावेत, अशा सूचना करुन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ शेलार म्हणाले, तसेच या ठिकाणी पर्यटक येण्यासाठी सोयी-सुविधा निर्माण कराव्यात. आधार व सेतु केंद्राची जिल्ह्यात संख्या वाढवावी. कलावंतांच्या विविध प्रश्नांबाबत व पेन्शनं संदर्भात एक नियमावली तयार करुन नियमित त्यांच्या संदर्भात बैठक घ्यावी, असेही निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ शेलार यांनी बैठकीत दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, पर्यजन्‍यमान, कृषी, उद्योग, विविध उपक्रम, पर्यटन वाढीसाठी करण्यात येणारे प्रकल्प, जिल्ह्याचे वैशिष्ट्य आदीबाबत माहिती देऊन किल्ले प्रतापगड संवर्धनासाठीचा उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. चित्रपट व मालिका व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध गड किल्ल्यांच्या विकासासाठीचे आराखडे, संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज, महाराणी तारा राणी, महाराणी येसूबाई यांच्या समाधी परिसराचा विकासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!