जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णु शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
सातारा दि. 1 : जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. विष्णू शिंदे हे 33 वर्ष 7 महिन्यांच्या प्रदीर्घ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सेवापूर्तीच्या सत्कार समारंभाला श्री. शिंदे यांच्या पत्नी नंदा शिंदे यांच्यासह सर्व कुटुंबीय तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयाचे वाहन चालक विष्णू पांडुरंग शिंदे यांनी आपल्या 33 वर्ष 7 महिन्यांच्या कालावधीत सेवा कालावधीत आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडल्या. वाहन चालविण्याबरोबरच शासकीय कार्यक्रमांचे छायाचित्रण, चित्रीकरणाचे विशेष कामकाजही अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळले आहे. त्यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींशी अत्यंत चांगला जनसंपर्क जपला व शासकीय कार्यक्रम योजना, ध्येय धोरणे, यशकथा यांची सर्वदूर प्रसिद्धी करण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले, असे कौतुकाचे उद्गार जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी काढले.
सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे यांनी वाहनचालक आणि कॅमेरामन अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावून शासनाची प्रामाणिकपणे सेवा केली. वाहनचालक पदावर काम करत असूनही फोटोग्राफीमध्ये कौशल्य त्यांनी दाखवले, असे कौतुकोद्गाराचा संदेश पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी पाठविला. त्यांनी यावेळी श्री. शिंदे यांच्या सेवापूर्तीनिमित्त पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.













