वाई येथील डॉक्टर महेश मेनबुदले यांच्या वैद्यकीय कर्तुत्वाचा गोव्यात होणार सन्मान
![]()
बावधन ( जि. सातारा ) गावात जन्माला आलेले महेश मेणबुदले डॉक्टर म्हणून प्रसिद्धीला आले, ते आपल्या सेवा, समर्पणाने. उपचारांतील ममत्वाने, वैद्यकीय कर्तृत्वाने!
वाई : आई- वडील मुलांना लौकिकाच्या वाटेने चालवत होते. त्यांच्या अपेक्षेबरहुकुम एमडी झालेल्या या सुपुत्राने, पीडितांचे आर्त निवारण करावे, दु:खितांना दिलासा द्यावा, रंजल्या गांजल्यांना आपले म्हणावे, हे व्रत घेतले. सातारा जिल्हा परिषदेची सरकारी आरोग्य केंद्र असलेल्या तापोळा (ता. महाबळेश्वर), कवठे (ता. वाई) येथून रुग्णसेवेस सुरुवात केली. डॉक्टरांनी दुर्गम- दुरितांशी, ग्रामीण लोकजीवनाशी आपल्या गुणकारी उपचारातून, आस्थापूर्वक, आपली नाळ जोडलीय. मिशनरी वृत्तीने काम करणाऱ्या या डॉक्टरांनी यथावकाश वाई येथे स्पंदन हेल्थकेअर नावाने स्वतःचे हॉस्पिटल स्थापन केले. त्यांना भास्कर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येत आहे.
कुटुंबीय आणि मातोश्री श्रीमती कमल यांच्या संकल्पनेतून पिताश्री स्व.दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठानची डॉ. महेश यांनी निर्मिती केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वी करिअर घडविणाऱ्या पाल्यांना शाळा कॉलेजमधून शोधून ; गौरविण्यात येते. विशेषत: प्रतिकूलतेशी दोन हात करून आपल्या मुला- मुलींना घडविणाऱ्या माता व पिता पालकांना पालक- पाल्य पुरस्काराने सन्मानित करणारे डॉक्टर आहेत महेश मेणबुदले.
रुग्ण परिचर्या आणि रुग्णालय व्यवस्थापनात माणुसकीची जाणीव जपणारे डॉक्टर आरोग्य विज्ञानाचे उपासक आहेत, मानवमित्र आहेत. त्यांचे सारे कुटुंबीय सभा, संमेलने ही संस्कृतीची भूषणे मानतात. त्यासाठी प्रबोधन, व्याख्याने आयोजित करतात. रक्तदान शिबिरे भरवतात. लोकोपयोगी कार्याला सढळ हस्ते मदत करतात. समाजाचे सांस्कृतिक भरणपोषण व्हावे, यासाठी दक्ष व प्रयत्नशील असतात.
कोरोनाने जगात हाहाकार माजवला,त्या काळात स्वतः दिव्यांग असलेले डॉक्टर घराबाहेर पडले. आणि कोविडच्या आव्हानाला भिडले. त्यासाठी अर्धांगिनी सौ.पल्लवी यांनी जड अंत:करणाने त्यांना परवानगी दिली. साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालयात एमडी डॉक्टर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वेच्छेने अर्ज करून, स्वतःचे हॉस्पिटल बंद ठेवून, जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले.
त्यानंतर बराच काळ कोविडचे संकट दारात असतानाही डॉक्टर घराबाहेर पडलेच. स्थानिक आमदार, राज्याचे विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री, श्री मकरंद पाटील सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले. संकटाची तीव्रता माहीत असूनही, धोका पत्करून डॉ. महेश मेणबुदले ठरले इतरांसाठी, रुग्ण आणि डॉक्टरांसाठीही आधाराचा हात. संकटकाळी एकमेकांना सावरण्याची उज्जवल परंपरा त्यांनी जोपासली. डॉक्टरांच्या शौर्याचा,धैर्याचा, समर्पण वृत्तीचा, संवेदनशीलतेचा पुढे गौरव होत राहिला- होत आहे.
शासनाचे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर असो वा स्वयंसेवी संस्थेचे. डॉ.महेश, सेवेला, सहकार्याला आणि कर्तव्यनिष्ठेला नेहमीच सिद्ध, सज्ज असतात. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी डॉ. मेणबुदले यांच्या आश्वासक बोलण्याला, चिकित्सेला, अनुभवसमृद्ध निदानाला आणि कौशल्याला रुग्ण दाद देतात आणि दुवाही देतात.
दुःखी- पीडितांची वेदना कमी करण्यासाठी धडपडणारे हे डॉक्टर सामाजिक सद्भावनांचे हक्कदार आहेत, हो नक्कीच!













