माझ्या पदरी अप्रतिम गाणी आली ; अमोल पालेकर
वाई, ता. २१ : रजनीगंधा असो किंवा चितचोर नेहमीच माझ्या पदरी अप्रतिम गाणी पडली, असे सुप्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेते व नामवंत दिग्दर्शक श्री अमोल पालेकर ‘जीवन नाट्याचा चित्रमय ऐवज’ या त्यांच्या प्रकट मुलाखतीत म्हणाले. वाई वसंत व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पात श्री अमोल पालेकर व सुप्रसिद्ध पटकथा लेखिका सौ संध्या गोखले- पालेकर यांची मुलाखत डॉ रूपाली अभ्यंकर व श्री मकरंद शेंडे घेत होते.
पालेकर म्हणाले, दिलीप जगताप, यमुनाबाई वाईकर,तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मुळे वाईशी बालपणापासूनच जवळून व दुरून संबंध आला. पण प्रांजळ मत हेच आहे की वाईत शूटिंग केले नाही हे चांगले झाले. शूटिंगचा कचरा ,बकालपणा यापासून वाई दूर राहिली. व्यक्तीश मी असा कचरा कधीच करत नाही.
मी जन्मतः बंडखोर नाही पण मोठे लेखक, कवी, साहित्यिक, राजकारणी यांच्या सहवासात राहून विचार स्पष्ट होत गेले. आणीबाणीच्या वेळी नाटकांतून विरोध केला. इंदिराजींना विरोध करून देखील त्यांनी माझे मत आदरले. आज मात्र माझ्या विचारांशी सहमत नसेल तो देशद्रोही असा दृष्टिकोन आहे. आज ग्लॅमरच्या या सृष्टीत मागे वळून पाहताना मला समजत नाही हे सारे कसे पेलले. ग्लॅमरच्या विश्वात राहणं साधलं कारण मी धर्मेंद्र ,अमिताभ, राजेश खन्ना यांसारखा हिरो कधी नव्हतोच. बस मधून फिरताना चप्पल तुटू शकणारा नायक मी होतो त्यामुळे लोकांना ते ओळखीचे वाटले, आवडले.
चित्रपटांत काम करताना बासुदा ,ऋषीदा या दिग्दर्शकांबरोबर अनेक अनुभव आले. बासुदा मितभाषी होते. एका लघुकथेवर दोन तासाचा सिनेमा करण्याची कल्पना त्यांना सुचली. असा वेगळा सिनेमा करायला आवडेल का असे विचारल्यावर मी क्षणार्धात हो म्हणालो. हाच चित्रपट म्हणजे रजनीगंधा होय. ऋषिदांनी गल्ला भरण्यासाठी कधीच चित्रपट बनवला नाही. आज बॉक्स ऑफिस चे कलेक्शन, अभिनेत्यांचे खाजगी आयुष्य व त्यावरचे गॉसिप हे सारे सांगितले जाते, चित्रपटांतून काय मिळाले ते सांगितले जात नाही.
सिनेमा हा तुकड्या तुकड्यातील प्रक्रिया आहे .नाटक तालमीत फुलत जाते नाटकात जागरूक राहावे लागते. ज्या गोष्टीत यश मिळाले त्यातला रस संपला म्हणूनच मी तीच तीच भूमिका करण्यास नकार दिला. घरोंदा मध्ये खलनायकाची भूमिका घेऊन थोडी रिस्क देखील घेतली. मात्र यामुळेच चित्रपटाचे वेगवेगळे पदर सापडले. येशूदास यांना मी म्हणालो होतो ‘आपकी वजेसे मुझे आवाज मिला’ यावर ते म्हणाले होते, ‘नही नही आपकी वजेसे मुझे चेहरा मिला’
कोविडच्या दरम्यान अशी जाणीव झाली की सिनेमा नाटक साऱ्याचा शेवट असतो. आपल्याला हवा तसा शेवट करता आला तर आनंद आहे. मृत्यूचे भय नाही याचा अर्थ असाही नाही की मी मृत्यूला कवटाळण्यास उत्सुक आहे. फक्त मिळालेली क्षण आनंदाने जगता आले पाहिजेत.
संध्या गोखले म्हणाल्या, स्वतःच प्रस्थ वाजवण्याची असुरक्षितता अमोल दांकडे कधीच नव्हती. लोकांना फक्त गोलमाल मधील अमोल पालेकर माहित आहे. त्यापलीकडचा, सात दशकांतला वेगवेगळ्या क्षेत्रातला ,भूमिकांतला वैचारिक व सामाजिक प्रवास लोकांना कळण्यासाठी त्याचे ‘ऐवज’ या पुस्तकात शब्दांकन केले.
अनाहत हा चित्रपट मल्टिप्लेक्स वरती एका शुक्रवारी रिलीज करायचा होता. अनेकांनी सर्वपित्री अमावस्या आहे दुसरा दिवस निवडा असे सांगितले. मात्र त्याच दिवशी रिलीज केला व पुढे तो 50 आठवडे चालला. मग हेच लोक तुम्हाला अमावस्या लाभते असे म्हणू लागले. आमच्या दोघांची श्रद्धा देवावर नाही माणसांवर आणि कामावर आहे.
प्रारंभी अमोल पालेकर व मकरंद शेंडे यांचा सत्कार उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांच्या हस्ते तर सौ संध्या गोखले पालेकर व डॉ रुपाली अभ्यंकर यांचा सत्कार कार्याध्यक्षा सौ तनुजा इनामदार यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परीचय टिळक स्मारक संस्थेचे संचालक श्री आदित्य चौंडे यांनी केले. प्रास्ताविक व वसंत व्याख्यामालेचा आढावा कार्याध्यक्षा सौ तनुजा इनामदार यांनी घेतला तसेच कार्यवाह व पत्रकार श्री भद्रेश भाटे यांनी आभार मानले. प्रायोजक गरवारे टेक्निकल फायबर्सचे जनरल मॅनेजर युवराज थोरात आणि श्री अनिल देव यांचा सत्कार प्रमुख पाहुणेचे हस्ते करण्यात आला. प्रेक्षकांनी या मुलाखतीस विशेष उपस्थिती दाखवली.
फोटो खालील ओळी:- अमोल पालेकर यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, शेजारी संध्या गोखले, डॉ रुपाली अभ्यंकर, मकरंद शेंडे
फोटो – विनोद सोहनी













