आपल्या ऋषीमुनींनी केलेले चिंतन हाच भारतीय संस्कृतीचा मुख्य आधार आहे ; डॉ.अभिजीत फडणीस
वाई, ता.१८:- आपल्या ऋषीमुनींनी केलेले चिंतन हाच भारतीय संस्कृतीचा मुख्य आधार आहे. हे चिंतन म्हणजे जीवन शिक्षण असून ते समाजापर्यंत आणि नव्या पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने भारत विश्वगुरु होईल, असे मत डॉ. अभिजीत फडणीस ( ठाणे ) यांनी येथे व्यक्त केले.
लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे
१६ वे पुष्प गुंफताना ‘ भारत विश्वगुरु होण्यासाठी ऋषिचिंतन जागवू या ‘ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
संस्थेचे संचालक आनंद शेलार होते.
डॉ.फडणीस म्हणाले, आपली ऋषी परंपरा ही मानवाच्या कल्याणासाठी ज्ञान देणारी आहे. त्यामध्ये आपल्या जीवनाकडे, समाजाकडे बघावे कसे याचा विचार आहे. ईश्वराने निर्माण केलेली आणि विविधतेने नटलेली सृष्टी म्हणजे निसर्ग, व्यक्ती, समाज याचा विचार करून प्रत्येकाने वागले पाहिजे. आपली संस्कृती ही ऋण संकल्पनेवर आधारित आहे. जन्माला येताना ही संकल्पना सोबत असते. प्रत्येक राष्ट्राला एक आत्मा असतो असे स्वामी विवेकानंद म्हणाले आहेत. आपल्या भारताचा आत्मा हा अध्यात्म म्हणजे जीवन विद्या आहे.
स्वामी चिन्मयानंद यांच्यामते लहानपणीच मुलांमध्ये अध्यात्म रुजले तर त्यांचे आयुष्य घडेल आणि कठीण प्रसंगातही ते समर्थपणे उभे राहू शकतील. ज्या विद्येमुळे केवळ पोट भरते ती साक्षरता असते. खर शिक्षण हे जीवन शिक्षणात आहे. आज जगात इहवाद आणि भोगवाद प्रचंड बोकाळला आहे. त्याच्या पोटी समाजाचा, पुढच्या पिढीचा बळी जात आहे. राष्ट्रा- राष्ट्रामध्ये परस्पर अविश्वास बनला आहे. भारत सामंजस्याचा प्रयत्न करतो. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्याने समाजात विश्ववल्ली फोफावल्या असून त्या वाढत जाणार आहेत. पंथीय अभिनिवेश उग्र रूपांतर घेत आहे. माणसांचे खुजेपण आणि तीव्र स्पर्धेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहे. आपल्या देशाचा अभ्युदय साधताना पुढच्या पिढीला द्यायचे काय हे लक्षात घेतले पाहिजे. स्पर्धेच्या युगात केवळ मार्क मिळवून करिअर घडविण्याचे ज्ञान घेण्याचा आग्रह धरला जातो. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचे शिक्षण जरूर घ्यावे परंतु त्याबरोबर जीवन शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. मात्र आपल्या शालेय शिक्षणात जीवन शिक्षणाचा समावेश नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी नरेंद्र गांधी यांनी प्रस्तावना केली.
सहकार्यवाह माया अभ्यंकर यांनी परिचय करून दिला.स्मिता कान्हेरे यांनी सत्कार केला. विलास कृष्णाजी साळुंखे व विनीत नारायण पोफळे प्रायोजक होते. चंद्रशेखर ढवण यांनी आभार मानले.
फोटो ओळी:- वाई वसंत व्याख्यानमालेत डॉ.अभिजीत फडणीस यांचा सत्कार करताना सौ स्मिता कान्हेरे शेजारी अध्यक्ष आनंद शेलार.













