विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य व संस्कृती मंडळ, भाषा विभाग यांना पूर्ण स्वायत्ता असेल तरच मराठी भाषेचा समृद्ध विकास होईल ; डॉ.राजा दीक्षित
वाई,ता. १५:- ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ यांनी आपल्या ३४ वर्षाच्या काळात विश्वकोश निर्मिती कार्यात स्वायत्तता जतन करून त्या माध्यमातून तत्त्वज्ञान, व्यवस्थापन, प्रशासन, पद्धतीशास्त्र यांचा पाया रचला. मात्र दुर्दैवाने आता ही स्वायत्तता राहिली नाही, अशी खंत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी व्यक्त केली. विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य व संस्कृती मंडळ, भाषा विभाग यांना पूर्ण स्वायत्तता असेल तरच मराठी भाषेचा समृद्ध विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत ‘ तर्कतीर्थ आणि मराठी विश्वकोश ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अनिल जोशी होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, आपल्याकडे प्राचीन काळापासून विविध कोशांची परंपरा आहे. १८ व्या शतकात इंग्लंड व फ्रान्स मध्ये आधुनिक कोशाचा पाया रचला गेला. त्याद्वारे जागृती केल्याने फ्रेंच राज्यक्रांती उदयास आली. त्यामुळे कोशकार क्रांती घडवू शकतात, हे स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जगातील संपूर्ण ज्ञान मातृभाषेत उपलब्ध करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या माध्यमातून मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य हाती घेतले. त्यावेळी तर्कतीर्थ जोशी यांच्यापुढे राज्यसभेवर घेण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र तर्कतीर्थानी भाषा समृद्धी करण्याचे काम हाती घेतले. त्यातून त्यांची ज्ञानाची भूक दिसते.
प्राज्ञ पाठशाळेत स्वामी केवलानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मकोश निर्मितीचे धडे घेतले होते.त्यांनी २० पैकी १५ धर्मकोशाचे संपादन केले. २० हजार पोथ्यांचे वाचन केले. धर्म समीक्षा हा सर्व समीक्षांचा प्रारंभ आहे. हा मूलभूत दृष्टिकोन होता. ऐतिहासिक परीक्षेत्रातून धर्माकडे पाहत होते. धर्म ही परिवर्तनीय गोष्ट आहे असे मानत होते. त्यांच्यावर केसरी, चिपळूणकर, टिळक, आगरकर, महात्मा गांधी, तसेच कालमार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता. कालमार्क्स विचाराला मर्यादा असल्याचे लक्षात आल्याने ते रॉय वादाकडे वळले. त्यांनी मानवतावादला लोकशाहीची जोड येथून आपला वैश्विक विचार पुढे नेण्याचे काम केले. त्यांच्याकडे वैश्विक दृष्टी होती. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना विश्व धर्मच अभिप्रेत होता. ते विश्व धर्माचे उपासक होते. त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता. त्याच्या व्यापक वैश्विकतेचे समर्पक विवेचन प्रा. रा. ग. जाधव यांनी ‘ शास्त्रीजी ‘ या पुस्तकात केले आहे.
रा. ना.चव्हाण यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात तर्कतीर्थ जोशी यांच्या आयुष्याचे सार दिसते. डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थाचे समग्र साहित्य खंड १८ नुकतेच प्रकाशित केले असून त्यातून त्याच्या स्वतःच्या साहित्य लेखन व समीक्षेची माहिती मिळते. जिज्ञासूंनी तर्कतीर्थांचे साहित्य वाचले पाहिजे.
तर्कतीर्थानी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. विश्वकोशाचा अथवा ज्ञानकोशाचा अध्यक्ष संपादक हा विचारवंत आणि सर्वांगी तत्त्वज्ञ असावा लागतो. विश्र्वकोशाचे पहिले तीन अध्यक्ष तर्कतीर्थ जोशी, रा.ग.जाधव व में. पू. रेगे हे आपले आदर्श आहेत. त्यांच्या सोबत काम केल्यानेच २७ मे २०२१ ते २६ मे २०२३ असे सव्वादोन वर्षे विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले.
त्यावेळी कोरोना होता. तर्कतीर्थांच्या स्मृती दिनाला अध्यक्ष झालो हा विलक्षण योगायोग आहे. या काळात कुमार विश्वकोशाचे दोन खंड पूर्ण झाले. आदिवासी पाण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विश्वकोश ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना कोणते साहित्य देतो, त्यावर आपले भविष्य अवलंबून आहे. त्यासाठी बाल विश्वकोश निर्मितीचे स्वप्न तर्कतीर्थ जोशी यांनी पाहिले होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली होती.
विश्वकोश निर्मिती, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, आणि भाषा विभाग शासनाच्या अधिपत्याखाली असल्याने निधीसाठी त्यांच्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे भाषा समृद्धीच्या कार्यात अडथळा येतो असेही ते म्हणाले.
अनिल जोशी यांनी अध्यक्षीय समारोपात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. प्रा. विष्णू खरे यांनी प्रस्तावना केली. रवींद्र लटिंगे यांनी वक्त्यांचा परिचय व सुत्रसंचलन केले.प्रायोजक माधव कान्हेरे व डॉ.सौ अर्चना चिंतामणी केळकर यांचा सत्कार वक्ते डॉ राजा दिक्षित यांचे हस्ते करण्यात आला. नागेश मोने यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्रोते उपस्थित होते.
फोटो ओळी :- वाई वसंत व्याख्यानमालेत बोलताना डॉ.राजा दीक्षित. त्यावेळी व्यासपीठावर अनिल जोशी.













