Thu, Jan 15, 2026
साहित्य

मुलांना शेती करायला शिकवा ; डॉ. संजय भावे

मुलांना शेती करायला शिकवा ; डॉ. संजय भावे
Ashok Ithape
  • PublishedMay 8, 2025

शेती आणि समाज या विषयावर व्याख्यानमालेचे सहावे पुष्प.

वाई, ता.६: मुलांना गोरा कुंभार, चोखामेळा यांची ओळख घडवा, शेती करायला शिकवा, भविष्य खूप सुंदर आहे मुले ते बघायला शिकतील. असे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू,सुप्रसिद्ध कृषी तज्ञ डॉ संजय भावे वाई वसंत व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पात ‘शेती व समाज’ वर बोलताना म्हणाले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे अध्यक्षस्थानी होत्या.

भावे म्हणाले, मी मूळचा कोकणी हे माझे भाग्य कारण कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत. कोकणातील शेतकऱ्यांना माहित आहे पैशाने पैसेवाला होता येते श्रीमंत नाही. आज ५००० वर्षांपूर्वी शेती कशी होती ते पाहणे गरजेचे आहे. स्थित्यंतरे समाजाने नव्हे तर असामाजिक दृष्टिकोनाने जास्त केले. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी होती आता मात्र उलटे झाले आहे. असे घडण्यामागचे कारण ‘शेती हा पैसे कमवण्याचे साधन आहे’ असा दृष्टिकोन. शेती हे भविष्याचे साधन आहे.
आपल्या संस्कृतीत पराशरा हा प्रथम वैज्ञानिक होता त्याने शेती कशी करावी हे सांगितले.

भारतातील सभ्यता सुरी ,चाकू, शस्त्रांवर घडल्या नाहीत त्या शेतीवर घडल्या. असं म्हणतात ब्रिटिश आले नसते तर राज्य कसं करावं हे भारताला कळलं नसतं. खरंतर ब्रिटिश आले नसते तर भारताने जगाला समृद्ध कसं व्हावं हे शिकवलं असतं. परकीयांनी जगाला जातीयवादी, भ्रष्टाचारी अशी भारताची चुकीची ओळख करून दिली. भारताची ओळख म्हणजे वास्तुशास्त्र ,आत्मिक ज्ञान ,अध्यात्म, शांतता.

गेल्या पाच हजार वर्षांपासून दोनच व्यवसाय अथक चालत आले आहेत, शिक्षण व शेती. पूर्वी शिक्षणात शेती अविभाज्यच होती. १९७६ ला पाश्चिमात्यांनी भारताला कृत्रिम शेती करा असे सांगितले व शेतीचे औद्योगीकरण केले. आता हेच पश्चिमात्य पुन्हा सेंद्रिय शेती करा सांगत आहेत. हाच तर भारतीय शेतीचा पाया आहे. भारतात शेती हा फक्त उद्योग नाही संस्कृती आहे. भारताला कृषी आणि ऋषींचा देश म्हणतात. पूर्वी मृग नक्षत्रात पेरणी लावणी, मळणी मग सुगीचे दिवस असायचे आता स्विगीचे दिवस आले आहेत.
भारतात सर्व ऋतू असतात त्यामुळे पाश्चिमात्यांचे अनुकरण करून शेतीसाठी कृत्रिम हवामान तयार करण्याची आवश्यकता नाही. ज्या क्षेत्रात जे पिकत तेच शरीराला योग्य असते ही मूल संकल्पना आहे. जर पिकवाल रान तर समाजात मान, शेती म्हणजेच उन्नती हे आता जाणण्याची वेळ आली आहे.

भावेंनी ‘अर्बन एग्रीकल्चर रिसर्च स्टेशन’ या आपल्या भविष्यातील उपक्रमाची माहिती दिली. टिळक ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री अमित वाडकर यांनी प्रास्ताविक केले. तर श्री अरुण अदलिंगे यांनी परिचय केला. कार्यक्रमाचे प्रायोजक श्रीमती वर्षा बेडेकर श्री भारत खामकर व श्री शैलेंद्र देवकुळे होते. श्रोत्यांनी व्याख्यानास मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

प्राचीन भारतातील शेतीची तथ्ये…..

• भारतातील सण हे शेतीवर आधारित.
• आयुर्वेद व शेती यांचा निकटचा संबंध.
• प्राचीन भारतीय शेतीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय.
फोटो खालील ओळी — मार्गदर्शन करताना डॉ संजय भावे शेजारी अध्यक्षा सौ भाग्यश्री फरांदे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!