Mon, Mar 2, 2026
साहित्य

नाटक हे वास्तवाचे दर्शन असते वास्तव नव्हे : पद्मश्री सतीश आळेकर

नाटक हे वास्तवाचे दर्शन असते वास्तव नव्हे : पद्मश्री सतीश आळेकर
Ashok Ithape
  • PublishedMay 4, 2025

सायूरी सणस l वाई, दि. ४ : नाटक हे वास्तवाचे दर्शन असते वास्तव नव्हे असे वक्तव्य सुप्रसिद्ध नाटककार व अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर यांनी केले. वाई वसंत व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पात नाट्य सिनेमामधील एक प्रवास या विषयावर लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली अभ्यंकर त्यांची प्रकट मुलाखत घेत होत्या.

श्री आळेकर म्हणाले, प्रत्येकाचेच बालपण कुठे ना कुठे गेलेले असते. काही संस्कार जवळचे वाटतात तर काही लांबचे. प्रत्येक लेखकाच्या मनात स्वतःच गाव असतं कधी ते कल्पनेतलं असतं आणि कल्पनेला सीमा नसतात.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मध्ये शिकत असताना माझे पहिले नाटक झाले. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या पहिल्या नाटकात मी नट नव्हे तर मदतनीस होतो. विंग मध्ये बसून नाटक पाहताना नाटक किती आभासी आहे हे कळाले. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि मेडिकलच्या परीक्षेत अपात्र ठरलो.

नैराश्यात असताना भालबा केळकर यांच्या अँपीथेटर मधल्या नाटकाच्या प्रयोगात दिलू नावाचे एक पात्र करण्याची संधी मिळाली. नाटकात मिळालेल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. आणि तेव्हा मला ‘theatre is like therapy’ या वाक्याचा अनुभव आला. भालबा केळकरांबरोबर काम करताना दिग्दर्शक कसा असावा हे समजलं.

घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग अगदी जर्मनीत जाऊन केले. घाशीराम कोतवाल चे अमेरिकेत १७ युरोपमध्ये ३०तर एकूण ५०० हून अधिक प्रयोग केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये ललितकला केंद्र विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करताना नवा अभ्यासक्रम तयार केला. संगीत नृत्य नाट्य यांची सांगड घातली. अभिनय हा नटात असावा लागतो तो सरावाने फुलवता येतो. नट होण्यासाठी खऱ्या खोट्या भावना दाखवाव्या लागतात क्षणार्धात. असा साक्षात्कारिक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात यावा लागतो.

विचारांमधील अवतरणांचे भान नाटककाराला असावे लागते.
परदेशात काम करताना आपली संस्कृती किती श्रीमंत आहे हे लक्षात आले. १९९० नंतर जग चकचकीत झालं. प्रत्येकाच्या खिशातच आता पडदा विकसित झाला आहे. लहान पिढी तर आता हा पडदा बघतच मोठी होते आहे.

आय.टी. , मेडिकल क्षेत्रातील महाविद्यालयांवरती १००-१०० कोटींपर्यंत खर्च करण्यात येतो मात्र परंपरागत कला शिकवण्यासाठी जुन्या इमारतीतील एक खोली सरकार देते. नाट्यगृहे तर बांधली जातात मात्र त्याचा मेंटेनन्स ठेवला जात नाही. शासनाने वर्षातून एकदा तरी सर्व नाट्यगृहांची डागडुजी करावी. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे आज महाराष्ट्रात व्यावसायिक नाटकांवरती कर आकारला जात नाही.

महानिर्वाण या नाटकामध्ये मृत्यूनंतरच्या १३ दिवसांच्या प्रवासाचे वर्णन आहे. शेवटची भैरवी मन हेलावून टाकते व शांतही करते. बेगम बर्वे या नाटकामध्ये चार संपूर्ण सामान्यत्व असलेले लोक व त्यांचे करूण काल्पनिक विश्व दाखवले आहे. पंचक मध्ये कोकणातील अंधश्रद्धेचे चित्रण केले आहे. ठकीशी संवाद मध्ये लॉकडाऊन मध्ये घरात अडकलेल्या वृद्धाच्या माध्यमातून २०१४ नंतरच्या बदललेल्या विश्वाचे दर्शन घडवले आहे.

पद्मश्री आळेकर यांनी नाटकातील छायाचित्रांच्या स्लाईड शो द्वारे आपल्या अनेक नाटकांची गहनता स्पष्ट केली. आळेकरांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर निर्माण केलेल्या लघुपटाचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. श्री.आदित्य चौंडे यांनी प्रास्ताविक केले तसेच सौ विद्या साळी यांनी आभार मानले. श्रीमती प्रतिभा नायगावकर, श्री. प्रकाश पानसे व श्री. मुकुंद चितळे यांनी कार्यक्रमाचे प्रायोजक केले होते. कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

फोटो खालील ओळी –पद्मश्री सतीश आळेकर यांची मुलाखत घेताना डॉ रुपाली अभ्यंकर.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!