पसरणीच्या जि. प. शाळेत पालक- शिक्षक मेळावा संपन्न
![]()
पसरणीसह मालकमपेठ राजेवाडीतील शिक्षक पालकांची उपस्थिती
वाई / प्रतिनिधी : पसरणी, ता. वाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने पालक शिक्षक मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. आजवरची गौरवशाली शैक्षणिक परंपरा आणि शाळेने घडवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा घेत शाळेच्या आगामी वाटचालीबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. मुख्याध्यापक श्री भांगरे यांनी प्रस्ताविकामध्ये शाळेची व विद्यार्थ्यांची प्रगती तसेच शाळेच्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच या ज्ञानमंदिराची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहितीही दिली. तसेच शैक्षणिक उपक्रमांच्या बरोबरीने निबंध, हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा कौशल्य तसेच मंथन आणि प्रज्ञाशोध परीक्षा यामध्येही शाळेचे विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेवाडी (पसरणी) शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोळे यांनी त्यांच्या शाळेतील प्रगतीचा अहवाल सादर केला. मंथन परीक्षेत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याचे तसेच इंग्रजी विषयात सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जा सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे संदीप जगताप यांनी समयोचित मार्गदर्शन करून मेळाव्यामध्ये चांगलीच रंगत आली.
माजी विद्यार्थी संघाचे विजय मुळीक यांनी त्यांच्या भाषणात मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि त्याबाबतची उपाययोजना व पालकांची जबाबदारी याबाबत मत- मतांतरे मांडली.
मालकम पेठ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महांगडे यांनी त्यांची शाळा शैक्षणिक गुणवत्तेच्या बरोबरीनेच शासकीय उपक्रम योजना उत्तमरीत्या यशस्वी करत असल्याचे सांगितले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रोहिदास शिर्के यांनी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी पालक व संघ कायम शाळेच्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांत व्यायामांची वाढ होण्याबाबत काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. उपाध्यक्ष संजय साबळे यांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांबरोबरच सर्व आठही अंगणवाडी सेविका व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे शंभरहून अधिक व्यक्तींच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.













