वाई तालुक्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू
![]()
दिलीप हा संपूर्ण परिसरात एकच कर्मचारी गोळेवाडी सारख्या अतिदुर्गम भागात वितरणाचे काम पहायचा. लाईन तुटली असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्याचे सासरे व त्याचा भाऊ व गोपाल हे तिघे काम करत होते, पण विद्युत वितरणाचा एकही कायम कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता असे दिसून आले.
वाई l प्रतिनिधी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी या दुर्गम भागात विद्युत वितरणच्या लाईन वर काम करीत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू झाला.
दिलीप विठ्ठल गोळे (वय 35 रा. गोळेवाडी) असे मृत्यू झालेल्या वायरमन चे नाव आहे. सबंधित कर्मचारी हा कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. गोळेवाडी परिसरात विजेमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे दिलीप गोळे हे कर्मचारी लाईन वरील देखभाल आणि दुरुस्तीचे काम करत होते अशातच विद्युत प्रवाह अचानक सुरू झाला त्यामुळे त्याला तीव्र स्वरूपाचा विद्युत झटका बसून जागीच मृत्यू झाला.
काम सुरू असतानाच प्रवाह सुरू करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे यामागे जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाही करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
गेल्या महिन्यातही एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात अमोल मच्छिंद्र चुनाडे (रा. वाई) या वायरमनचा असाच काम करत असताना मृत्यू झाला होता त्यालाही सबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी जबाबदार आहेत अशी चर्चा पश्चिम भागातून होत आहे.
दरम्यान पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्वतोपरी त्वरित मदत करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास वाई पोलिस स्टेशन करत आहे.













