कवयित्री डॉ.योगिता राजकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान
![]()
मुबईतील रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते डॉ राजकर यांचा गौरव.
वाई / प्रतिनिधी : मुंबई पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांच्या साहित्य संमेलनात वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना त्यांच्या बाईपण या दीर्घ कविता संग्रहाला मास्तरांची सावली काव्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप झालेल्या सदर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ.राजकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर, मास्तरांची सावली ग्रंथाच्या शब्दांकार लेखिका प्रा. डॉ. स्नेहा सावंत आदी उपस्थित होते.
याचवेळी प्रदीप आवटे पुणे, मधुकर मातोंडकर सिंधुदुर्ग, सुनील उबाळे,छत्रपती संभाजीनगर, सुजाता राऊत मुंबई,सफरअली इसफ सोलापूर या साहित्यव्रतींचाही त्यांच्या उत्तम साहित्य कृतींसाठी मास्तरांची सावली या पुरस्काराने गौरविण्यात आला. यात डॉ.राजकर यांच्या बाईपण या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार प्राप्त झाला असून बाईपण साठी मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी मुंबई एकता कल्चरल अकादमीचा नारायण सुर्वे काव्य पुरस्कार देऊन बाईपण या दीर्घ कवितासंग्रहाचा गौरव करण्यात आला होता.
बाईपण ही डॉ राजकर यांची दीर्घ कविता असून मराठी कवितेच्या परंपरेत अपवादाने कवयित्रींनी दीर्घ कविता लिहिली आहे. त्यातही स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून एवढी दीर्घ कविता प्रथमच लिहिली गेली असल्याचे मत मराठी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. बाईपण या कवितेत बाईच्या रोजच्या जगण्याच्या ताण्याबाण्यासह तिची परंपरेने केलेली घुसमट आणि त्या घुसमटीमध्ये तिचा कोंडलेला श्वास याबद्दल तीव्रतेने मांडलेलं शब्दचित्र आहेच; परंतु बाईच्या शोषित वृतीला कवयित्रीने आवाज देऊन बाईच्या वेदनेची नस नेमकेपणाने या कवितेत पकडली आहे.
यामुळेच मास्तरांची सावली पुरस्कारासाठी सदर संग्रहाची निवड करण्यात आली असल्याचे स्वामीराज प्रकाशनाचे प्रकाशक रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनाचे प्रकाशक अजय कांडर यांनी स्पष्ट केले. या संग्रहाला ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांची पाठराखण लाभली असून सदर पुरस्काराबद्दल मराठी साहित्य क्षेत्रातून डॉ. योगिता राजकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो ओळी: कवयित्री डॉ.योगिता राजकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान करताना प्रमोद पवार, अजय कांडर, रजनीश राणे, प्रा.डॉ.नेहा सावंत













