Thu, Jan 15, 2026
पर्यावरण

भुईंजला कृष्णेतून वाळू काढण्यावर बंदी घालण्याची मागणी

भुईंजला कृष्णेतून वाळू काढण्यावर बंदी घालण्याची मागणी
Ashok Ithape
  • PublishedMarch 30, 2025

पर्यावरणाची हानी आणि मंदिर व घाटांचे नुकसान होण्याची भीती; तहसीलदारांना निवेदन

भुईंज / प्रतिनिधी : येथील कृष्णा नदीच्या काठावर पुरातन मंदिर मठ तसेच तटबंदी व घाट असून नदीपात्रातून वाळू काढणारे ठेकेदार व अवैध वाळू तस्करांच्या वारेमाप वाळू उपसण्यामुळे मंदिर परिसरासह तटबंदी मठ व घाट यांना धोका पोहोचत आहे. त्यामुळे भुईंजमधील कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी घालावी, अशी मागणी राजेश जगन्नाथ भोसले (पाटील) व सहकाऱ्यांनी केली आहे.

याबाबत वाईच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुईंज हे वाई तालुक्यातील महामार्गालगतचे व्यापारपेठेचे ऐतिहासिक आणि पुराणप्रसिद्ध गाव आहे. येथून वाहणाऱ्या कृष्णा नदी काठालगत पुरातन तटबंदी तसेच घाट असून घाटालगत श्री महालक्ष्मी मंदिर तसेच भृगुऋषी महाराजांचा मठ तसेच अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत.

यापूर्वी भुईंजमधील कृष्णा नदीपात्रातून फारसा वाळू उपसा कोणी केला नव्हता, मात्र गेल्या दीड महिन्यांपासून येथे बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपस्याबाबत सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे विचारणा केली असता ते कोणीही याबाबत अवाक्षर काढत नाहीत. त्यांच्या परवानगीशिवाय जर हा वाळू उपसा होत असेल तर तो थांबवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने मोहीम राबवणे गरजेचे आहे. सदर ठिकाणी सध्या रात्रंदिवस वाळू काढण्याचे काम सुरू असून त्यासाठी पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर आदींचा सर्रास वापर होत आहे.

या वारेमाप वाळू उपसामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून भविष्यात महापूर आल्यावर काही अपघातही घडू शकतात. तसेच तट, घाट आणि मंदिरांसही त्यामुळे धोका उद्भवत आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तहसीलदारांनी पाहणी करावी व भविष्यात काही अघटीत नैसर्गिक भीषण घटना घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा संभाव्य दुर्घटनांना प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागत असल्याने लहान मुले गावाला मैदान नसल्याने नदीपलीकडच्या काठावर क्रिकेट खेळत असतात. तसेच पोहण्यासाठीही नदीपात्रात उतरतात. मात्र वाळू उपसल्याने पडलेल्या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे येथील वाळू उपसा तत्काळ थांबवून नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी उपाय योजना राबव्यात आणि भुईंज येथील घाटासमोरील बाजूस वाळू काढण्यासाठी परवानगी देऊ नये, असेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर राजेश भोसले (पाटील), यांच्यासह अजित अंकुश भोसले, शेखर बाळासाहेब भोसले (पाटील) आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

वाळू उपशामुळे पर्यावरणास धोका.. पर्यावरण प्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन..

क्रमशः भाग १

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!