Mon, Mar 2, 2026
यशोगाथा

30 हजार मुलाखती ! आकाशवाणीच्या विक्रांतचा विक्रम

30 हजार मुलाखती ! आकाशवाणीच्या विक्रांतचा विक्रम
Ashok Ithape
  • PublishedMarch 29, 2025

मीतभाषीय व्यक्तीलाही आपल्या सहज सोप्या प्रश्नांनी बोलतं करणारी … प्रसंगी आपल्या प्रश्नांनी समोरच्याला भावविवश, हळवं बनविणारी, ढसढसा रडविणारी तर प्रसंगी दिलखुलास हसवणारी संवदेनशील मुलाखत ही सर्वोत्तम ठरत असते. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे यांनी आजवर अशा 30 हजारजणांच्या मुलाखतींचा टप्पा गाठत यशस्वी मुलाखतकाराचा एक प्रकारे विक्रम गाठला आहे.

बीई इलेक्ट्रॉनिक्स पदवी घेतल्यानंतर काही काळ पुण्याला नोकरी केल्यानंतर विक्रांत मंडपे हे 1994 ला आकाशवाणीला ट्रान्समिशन एक्झीक्युटीव पदावर रुजु झाले. त्याआधिही एसटीआय आणि पीएसआय या पदावर त्यांची निवड झालेली होती. आपल्या सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये प्रश्न विचारुन योग्य व नेमकी माहिती समोरच्याकडून काढण्याचं कौशल्य श्री. मंडपे यांच्याकडे आहे. याच जोरावर त्यांनी नुकतीच 30 हजारावी मुलाखत घेवून एक टप्पा पूर्ण केला आहे.

त्यांनी दिवसाला चार-पाच काही वेळेला 25-25 मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्यामते मुलाखतकाराला सर्व गोष्टींचे थोडे थोडे ज्ञान हवे. चौकसपणा, निरागसता, उत्सुकता त्याच्यामध्ये हवी आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे मुलाखातकार उत्कृष्ट श्रोता हवा तरच तो यशस्वी मुलाखतकार बनू शकतो.

शिवथर येथील एका माजी सरपंचाने आपली शेती राजकारणात विकली. सरपंच पदाची झूल उतरताच वास्तवता कळू लागली आणि शिल्लक राहिलेल्या 14 गुंठे जमिनीत तो भाजी पिकवू लागला. आणि ती भाजी सायकलीवरुन तो ओरडून विकत असे. या शेतकऱ्याची मुलाखत यशोगाथा या कार्यक्रमात त्यांनी घेतली. ज्या रस्त्यावर सरपंच म्हणून वावरला त्याच रस्त्यावर सायकलीवरुन ओरडत भाजी तो विकायचा. या विषयीचा प्रश्न विचारताच ती 60 वर्षाची व्यक्ती ढसाढसा रडली. ही संवेदनशील मुलाखत कायम लक्षात राहिल्याचे श्री. मंडपे आपल्या आठवणीत सांगतात. दासनवमीच्या निमित्ताने मारुतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी यांची आपल्या आयुष्यात आपण घेतलेली पहिली मुलाखत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एका तहसीलदाराची मुलाखत आपल्यासाठी अवघड ठरल्याचे त्यांनी सांगितले. हा तहसीलदार हे काम वरिष्ठांचे आहे, असे सांगून हाताला काही लागू देत नव्हता. तर एका माजी हिंदकेसरी पैलवानाची मुलाखत ही श्रोता म्हणून माझ्यासाठी विनोदी ठरल्याची आठवण त्यांनी सांगितली. या विषयी ते म्हणाले, एक क्रीडा प्रतिनिधी या पैलवानाची मुलाखत घेत होते. बाजुला मी ऐकत बसलो होतो. दणकट असणाऱ्या या पैलवानाची भाषिक कौशल्य जाणवत होती. ते ग्रामीण ढंगात बोलायचे. ‘कुस्ती क्षेत्रातील आपले योगदान सांगा’ या प्रश्नावर त्यांनी, खुराक महाग झालाय, असे उत्तर देवून त्यावरच अधिक भर दिला.

‘आपला आवडता डाव कोणता’ या प्रश्नावर क्षणात काय घडले हे लवकर कळाले नाही. क्रीडा प्रतिनिधीच्या दोन्ही तंगड्या वर होत्या. तो खुर्चीवरुन खाली पडला होता आणि हे पैलवान महाशय माईकजवळ तोंड नेवून “ह्यो” असे सांगत होते. प्रत्यक्षात डावच करुन महाशयांनी दाखविला होता.

युनाटेड वेस्टर्न बँकेच्या विलीनीकरणावेळी सकाळी 9 ते रात्री 9 मॅराथॉन मुलाखती घेतल्याचे सांगून ते म्हणाले, आरबीआयच्या प्रमुख अल्पना किलावाला यांचा दीड तासाचा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित करण्यात आला होता. त्याचबरोबर गणपती दूध पिताना या घटनेवेळी विविध मुलाखती घेवून अपेक्षित परिणाम करणारी उत्तरे मिळविणे हे या वेळचे कौशल्य होते. कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तने आलेले माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची घेतलेल्या मुलाखतीचा परिणाम त्यांच्या अंमलबजावणीतून तात्काळ जाणवला. साताऱ्यात आलेले सर्व आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलाखती मी घेतल्या.
सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून माझ्या मुलाखती झाल्या, असे सांगून श्री. मंडपे म्हणाले, शौर्यगाथा हे माजी सैनिकांसाठी मुलाखत सदर घेतले होते. यामध्ये निवृत्त कर्णल आर.डी. निकम यांची दोन तास मुलाखत घेतली होती. त्याचबरोबर या सदरातील 12 मुलाखतींमुळे गावागावात माजी सैनिकांच्या कमानी दिसू लागल्या हे याचे यश म्हणावे लागेल आणि माजी सैनिकाच्या हस्ते माझा गौरव करण्यात आला हा क्षण माझ्या आयुष्यातील महत्वाचा ठरला.

प्राचार्य आर.एच. भोसले यांची मुलाखत माझ्यासाठी भावनिक ठरली. आईच्या आठवणी सांगताना त्यांच्या आठवणी मी स्वत: हारवून गेलो. पुढचा प्रश्न सुचलाच नाही. पोवईनाक्यावर कांदे सोलून विकणारे ढेकणे नावाच्या महिलेच्या भाषेत तफावत जाणवायची. सन्मानाचं जगणं जगणारी महिला कशी असते या विषयी मला कुतुहल निर्माण झाले आणि एकदा मी तीची मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर मात्र त्या महिलेला मदतीचा ओघ सुरु झाला.
पत्नी वैशाली, सई आणि इरा या दोन मुली असे चौकौनी कुटुंब असणाऱ्या श्री. मंडपे यांच्या कुटूंबाला आकाशवाणीचा पाचवा कोन लाभलेला आहे, त्यालाच पुरातन संशोधनाची किनारही लाभलेली आहे. याच जोरावर नवनवीन विक्रमांचा टप्पा विक्रांत गाठतील यात शंका नाही.

– प्रशांत सातपुते,

जिल्हा माहिती अधिकारी

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!