Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedMarch 28, 2025

सातारा दि.28: सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस विभागाने जिल्ह्यातील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही.व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जात आहेत याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. अवैध्यरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.

जिल्ह्यातील मोठे हॉटेल, लॉज यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी व अंमली पदार्थ आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करावे. अंमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकाव्यात, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत. पोलीस विभागाने ड्रग पडकल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी यंत्रसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!