Thu, Jan 15, 2026
मनोरंजन

सई परांजपे यांच्या नजरेतून जग : एनएफडीसी- भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार येथे विशेष चित्रपट रसास्वाद

सई परांजपे यांच्या नजरेतून जग : एनएफडीसी- भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार येथे विशेष चित्रपट रसास्वाद
Ashok Ithape
  • PublishedMarch 21, 2025

मुंबई, 20 मार्च 2025

प्रसिद्ध दिग्दर्शिका, नाटककार, लेखिका सई परांजपे यांच्या गौरवशाली जीवनाचा आणि कारकिर्दीचा उत्सव साजरा करणारा ‘सई परांजपे यांच्या नजरेतून जग’, हा विशेष चित्रपट रसास्वाद एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाने (एनएफडीसी-एनएफएआय) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सादर करताना एनएफडीसी-एनएफएआयला अभिमान वाटत आहे.

पुण्यातील एनएफडीसी-एनएफएआय येथे 21 ते 23 मार्च  2025 या कालावधीत होणारा हा महोत्सव काळजीपूर्वक आखण्यात आला आहे. या महोत्सवात सई परांजपे यांचे विविध संकल्पना,धाटणी आणि सिनेमॅटीक शैलीचे नऊ महत्त्वाचे चित्रपट दाखवले जातील.  हा महोत्सव  अधिक संस्मरणीय व्हावा यासाठी सई परांजपे यांना आमंत्रित करण्यात आले असून त्या स्वतः त्यांच्या चित्रपटांची ओळख करून देतील आणि चित्रपटांनंतरच्या चर्चांमध्ये भाग घेतील. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची,  त्यांची सर्जनशील अंतर्दृष्टी जाणून घेण्याची,  त्यांचे अनुभव ऐकण्याची एक दुर्मिळ संधी प्राप्त होईल.

या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निधी पुरवलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत 4K मध्ये पुनर्संचयित केलेले आणि 2K मध्ये डिजिटायझेशन केलेले  निवडक चित्रपट पाहता येतील. हा उपक्रम भारताच्या समृद्ध चित्रपट वारशाचे जतन करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या उत्कृष्ट कलाकृती उत्तम  दर्जामध्ये उपलब्ध राहाव्यात यासाठी  एनएफडीसी-एनएफएआयची  वचनबद्धता अधोरेखित करतो.

या महोत्सवाची सुरुवात शुक्रवार 21 मार्च रोजी मुलांच्या आवडत्या ‘जादू का शंख'(1974), या चित्रपटाने होईल. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी समुदायांभोवती केंद्रित हृदयस्पर्शी कथा असलेला  ‘पपीहा’ (1993) हा चित्रपट दाखवला जाईल. शनिवार 22 मार्च रोजी ऐतिहासिक दंतकथा  ‘सिकंदर'(1976) दाखवला जाईल. हॉर्न पुकारे (2009) आणि ‘सुई’ (2009) या लघुपटांचा आनंदही या दिवशी घेता येईल. भारतीय समाजाचे समकालीन प्रतिबिंब यातून दिसते. स्थलांतर आणि विस्थापन यावरील ‘दिशा'(1990) हा चित्रपट दुपारी दाखवण्यात येईल. तर संध्याकाळी सदाबहार ‘कथा'(1982) हा  चित्रपट दाखवला जाईल. महोत्सवाचा समारोप 23 मार्च रोजी होईल. स्वच्छता आणि आरोग्य यांना प्रोत्साहन देणारा ‘चकाचक’ (2005) हा बालचित्रपट या दिवशी दर्शवला जाईल. भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगात दोन बहिणींच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘साज’ सादर होईल. यातील प्रत्येक चित्रपट सहानुभूती, सामाजिक भाष्य आणि आनंद या संकल्पना सई परांजपे यांनी आपल्या चित्रपटांमधून सातत्याने कशा जपल्या ते दाखवतात.    अतिशयोक्तीकडे चित्रपट झुकण्याच्या  काळात सई परांजपे यांचे चित्रपट साध्या, हृदयस्पर्शी कथाकथनाच्या शाश्वत शक्तीचे स्मरण  करून देतात.

प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांसाठी खुला आहे.

हा महोत्सव सई परांजपे यांच्या समृद्ध चित्रपट वारशाचे कौतुक करण्यासोबतच पुनर्संचयनाद्वारे या कथा जिवंत ठेवण्याचे एनएफडीसी-एनएफएआयचे प्रयत्नदेखील अधोरेखित करतो. यामुळे सई परांजपे यांच्या चित्रपटातल्या  जगाची उमज नव्या पिढीतील रसिकांनाही होईल.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!