पुण्यातील राज्य वक्तृत्व स्पर्धेत वाई येथील सायुरी सणस प्रथम
वाई / प्रतिनिधी : पुणे येथे नुकत्याच झालेल्या लोकमान्य वाग्नज्ञ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वाईच्या किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थिनी सायुरी उमेश सणस हिने प्रथम क्रमांक संपादन केला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुण्यातील क्लब हेरिटेज आणि लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी यांच्यातर्फे सलग बाराव्या वर्षी ही स्पर्धा संपन्न झाली. यंदा या स्पर्धेचे बारावे वर्ष होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झालेल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यभरातून सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सायुरी सणस हिने इयत्ता अकरावी ते पदवी स्तरावरच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व अन्य प्राध्यापक, तसेच रवींद्र भोसले व विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. उमेश सणस यांची सायुरी ही सुकन्या असून यापूर्वीही तिने विविध वक्तृत्व, निबंधलेखन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे.













