Mon, Mar 2, 2026
सामाजिक

रोटरीच्या माजी प्रांतपाल रो.स्वाती हेरकळ यांना रोटरी इंटरनॅशनलचा पीपल ऑफ ॲक्शन चॅम्पियन ऑफ पीस हा जागतिक पुरस्कार जाहीर.

रोटरीच्या माजी प्रांतपाल रो.स्वाती हेरकळ यांना रोटरी इंटरनॅशनलचा पीपल ऑफ ॲक्शन चॅम्पियन ऑफ पीस हा जागतिक पुरस्कार जाहीर.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 27, 2025

वाई : रोटरी इंटरनॅशनलने 2024-25 साठी आपल्या प्रतिष्ठित पीपल ऑफ ॲक्शन चॅम्पियन ऑफ पीस सन्मानासाठी जगभरातील सहा मान्यवरांमध्ये स्वाती हेरकळ यांची निवड जाहीर केली आहे. त्यांना हा पुरस्कार कॅनडा येथे रोटरी कन्व्हेन्शनमध्ये देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मधील रोटरी क्लब ऑफ वाईच्या सदस्या असलेल्या स्वाती हेरकळ यांनी शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी त्यांनी काही अभिनव संकल्पना विकसित केल्या.

रो.स्वाती हेरकळ यांनी माती पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत शेतीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आणि शांतता कशी प्रस्थापित करता येऊ शकते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे शेतीतील उत्पादनवाढ, शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन शक्य झाले आहे.

मेणवली, भोगाव आणि पांडेवाडी या तीन गावांमध्ये शाश्वत शेती तंत्र प्रचार आणि प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ वाई यांनी द रोटरी फाऊंडेशनच्या माध्यमातून मेणवली विकास सोसायटीला 3 संचामध्ये ट्रॅक्टर, माती पुनरुज्जीवन साठी विशिष्ठ शेती औजारे, मळणी यंत्रे, पाण्याचा टँकर आणि जैविक खत निर्मितीसाठी 1120 ड्रम दिले आहेत. शेतामध्ये नांगर न घालता, मातीमधील जैववैविधता जपत कमी खर्चात शेती करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. रुंद वाफ्यावर लागवड करणे, घरी बनवलेली फक्त जैविक खते, जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरल्यामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी झाला असून आरोग्यदायी शेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याच बरीबर उत्पन्नात पण वाढ झालेली आहे. गावे स्वच्छ राहण्यास मदत झाली आहे.

आजपर्यंत 1,100 हून अधिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेतला असून, पर्यावरणपूरक आणि खर्च बचतीच्या शेती पद्धती आत्मसात केल्या आहेत. आता रो.स्वाती हेरकळ यांनी या संकल्पनेचा विस्तार करत महिला बचतगटांबरोबर सहयोग करून विविध गावांमध्ये व्यापक परिणाम साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!