प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई संस्थेचा नवभारतचा दृश्यकला दिवाळी विशेषांक प्रसिद्ध
वाई दि. १५ : प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई या संस्थेने सन २०२४ मध्ये नवभारतचा दृश्यकला दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केला असून मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांनी नवभारतच्या दिवाळी विशेषांकास विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हा अंक दृश्यकला विशेषांक असून या अंकास वरील संस्थेने दत्ता टिपणीस स्मृती उत्कृष्ठ अंक या सदराखाली पुरस्कार जाहीर केला असून सदरचा पुरस्कार गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी दादर येथील सार्वजनिक वाचनालयात दिला जाणार आहे.
त्याचप्रमाणे या दिवाळी अंकास कल्याण येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेने तृतीय क्रमांक देऊन नवभारत दिवाळी अंकास सन्मानित केलेले आहे. या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक म्हणून जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सुहास बहुळकर व कलाक्षेत्रातील अन्य मान्यवरांनी या अंकासाठी योगदान दिलेले आहे.
नवभारत हे मासिक १९४७ साली आदरणीय शंकरराव देव यांनी सुरू केले असून या अंकाने आपल्या वाटचालीचे पाऊण शतक पूर्ण केलेले आहे.
नवभारत हे मासिक पूर्णतः वैचारिक स्वरूपाचे असून गेल्या ७५ वर्षांतील वैचारिक आढावा घेणारे आहे. या अंकातील भाषा, साहित्य, राजकारण, विज्ञान आदी विषयांवर संशोधन झाले असून शिवाजी व पुणे विद्यापीठातील ७ लोकांनी नवभारतवर पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.
२०२४ च्या जानेवारी मध्ये नवभारतचे भूतपूर्व संपादक प्रा. मे. पुं. रेगे यांचे शताब्दी वर्ष असल्याने ‘प्रा. मे. पुं. रेगे स्मृती विशेषांक’ प्रसिद्ध केला आहे. प्राज्ञपाठशाळामंडळाचे मुख्य उद्धिष्ट समाजप्रबोधन हे असून या अनुशंगानेच नवभारतचे प्रकाशन अखंडपणे आजवर सुरू आहे. ‘नवभारत २०२४ च्या ‘दृश्यकला दिवाळी विशेषांकास’ ज्या पद्धतीने महाराष्ट्राने सन्मानित केले आहे हा प्राज्ञपाठशाळामंडळाचा फार मोठा बहुमान ठरलेला आहे.’













