Thu, Jan 15, 2026
शिक्षण

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedFebruary 12, 2025

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी-  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

सातारा, दि. 12: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य पिढ्यानं पिढ्यासाठी प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला देते. त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्‍ट्या वंचित जनतेच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव मस्के, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप, कुलसचिव डॉ. विजय कुंभार आदी उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, शिक्षण आणि जीवन व्यवहारांचा समन्वय असणे आवश्यक आहे. जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे. याचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आणि विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या बाजारात टिकणारे असले पाहिजे, या दृष्टीने शैक्षणिक धोरण विकसित केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणासाठीच्या चिकाटीच्या बांधिलकीत आहे. शिक्षणाद्वारे वंचितांना सक्षम बनविणे, त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे यावर त्यांचा विश्वास होता, असे सांगून राज्यपाल म्हणाले, आज आपण एकता, बंधुता, सामाजिक न्याय यावंर चर्चा करतो पण याची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांनी केली. जाती, धर्माच्या आधारावर आपण माणसा-माणसात भेद करु शकत नाही. एखाद्या विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आपण कोणाला थोर अथवा कनिष्ठ ठरवू शकत नाही. माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या कतृत्वावरुन ठरते, ही गोष्ट आपण जन्मभर लक्षात ठेवली पाहिजे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे अलिकडेच सन 2021 मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ आहे. पण या 4 वर्षाच्या काळात या विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे सांगून राज्यपालांनी विद्यापीठाचा परिसर स्वच्छ आणि सुव्यस्थित ठेवल्याबद्दल कौतूक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलेले आहे. ते सुरु करताना भारताला सर्वात स्वच्छ, सुव्यस्थित आणि हरित देश बनविण्याचे स्वप्न त्यांच्या उराशी होते. हे लक्षात ठेवून आपणही त्यामध्ये योगदान दिले पाहिजे, असे सांगितले.

विद्यापीठाबद्दल बोलताना ते म्हणाले, 2021 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात तीन घटक महाविद्यालयांचा समावेश आहे. ज्यामध्ये 7 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे ज्ञान आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे. पण एवढ्यावरच संतुष्ट न राहता आपण अधिकाधिक प्रगती करत राहिलो तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करु शकू. विद्यार्थ्यांनो तुम्ही प्रथम आज्ञाधारकपणा शिका, कारण विद्यापीठांमधले जीवन आणि बाहेरच्या जगातले जीवन यात फार फरक असतो. चांगले सामाजिक जीवन जगणे ही अवघड पण फार महत्वाची बाब आहे. पहिल्यांदा तुम्ही आज्ञाधारकपणा शिका, आदेश देणे तुम्हाला आपोआप जमेल.

कोणतेही यश हे समर्पण, कष्ट याशिवाय मिळत नाही. संपूर्ण क्षमता वापरुन, झोकून दिल्याशिवाय ते मिळत नाही. जीवन हे पुढे पुढेच जात असते, पण जर आपण जीवनात यशस्वी झालो नाही तर त्याचा काय लाभ असे सांगून राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, तुमची उद्दिष्टे निश्चित करा. त्यासाठी गतीने प्रयत्न करा. आपली तुलना कधीही दुसऱ्याशी करु नका. प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. कधीकधी उद्दिष्टपूर्तीच्या वाटेत नैराश्यही येते, अशावेळी अल्प विश्रांती घेण्यात काहीही गैर नाही. पण ध्येय अर्धवट सोडू नका. सातत्यपूर्ण प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. तुमच्यात उत्सुकता, प्रेरणा, उर्जा सदैव जागृत ठेवा, अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कुलाधिकारी श्री. दळवी म्हणाले, देश व राज्य सुसंस्‍कृत करण्यात रयत शिक्षण संस्थेचे योगदान अमुल्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न शासनाच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. हे विद्यापीठ रयत शिक्षण संस्थेसाठी मानबिंदू आहे. यशाचा रस्ता अनेकदा खडतर असतो आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी केला तर तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून वेगळी ओळख निर्माण करु शकाल. शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या विद्यापीठामध्ये सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ बनण्याची क्षमता आहे.

यावेळी कुलगुरु डॉ. मस्के यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा वार्षीक अहवाल सादर केला. विविध विद्या शाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना सादर केले. विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना प्रत्यक्ष समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी देण्यात आली. पदवी परिक्षेत 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या अर्जांनुसार पदवी देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!