Thu, Jan 15, 2026
अध्यात्म साहित्य

विश्वधर्माचे उपासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

विश्वधर्माचे उपासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
Ashok Ithape
  • PublishedJanuary 22, 2025

“शास्त्रीजी तुम्ही कोणता धर्म मानता?” शास्त्रीजी म्हणाले, “मी विश्वधर्म मानतो”,

धर्मशास्त्राचे गाढे पंडित, साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक, प्राज्ञपाठशाळामंडळाचे अध्यक्ष, नवभारत मासिकाचे संपादक, धर्मकोशाचे प्रमुख संपादक, स्वातंत्र्य सैनिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संस्कृततज्ञ, समीक्षक, ज्येष्ठ वक्ते, ‘प‌द्मविभूषण’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २०२५ हे शतकोत्तरी रोप्यमहोत्सवी वर्ष आहे. आपल्या विविध गुणांनी आणि कतृत्वाने संपन्न असणारे तर्कतीर्थ जोशी २० व्या शतकांतील ‘लोकहितवादी’ झाले. ९४ वर्षे असे दीर्घायुष्य लाभलेले तर्कतीर्थ जोशी म्हणजे एक आनंदयात्री होते.

२ फेब्रुवारी १९१४ मध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या खेड्यातून आलेले लक्ष्मण बाळाजी जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाने आठ दशके महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती, राजकारण यावर आपले महत्त्व टिकवून धरले. हा आठ दशकांचा कालावधी म्हणजे संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्राचा साहित्य, संस्कृती व राजकारण याचा चालता बोलता इतिहास ठरला. धर्मशास्त्राचे सखोल अध्ययन करण्याच्या हेतूने आलेले लक्ष्मण बाळाजी जोशी पद्मविभूषणाने सन्मानित झाले. आयुष्यभर मैत्री हे मूल्य त्यांनी जाणीवपूर्वक जोपासल्याने त्यांना या आठ दशकांतील आयुष्याच्या काळात अगणित मित्र लाभले. त्यामध्ये साहित्यिक होते, धर्मपंडीत होते, राजकीय नेते होते, समाजसुधारक होते आणि जीवाभावाचे संगीततज्ञ देखील होते. या सर्वाचे कारण म्हणजे तर्कतीर्थ जोशी यांनी एक जीवनसूत्र जोपासले होते. ते म्हणजे ‘जगी आहे जगंमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र.’

१९१४ मध्ये वाईत आल्यानंतर लक्ष्मण बाळाजी जोशी यांना गुरू भेटले ते ‘स्वामी केवलानंद सरस्वती !’ केवलानंद सरस्वती हे स्वतः वेदशास्त्र संपन्न होतेच पण ते आदर्श शिक्षक आणि पुरोगामी विचारांचे पालनकर्ते होते. १९१७ साली केवलानंद सरस्वती म्हणजे पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे यांचेकडे वेदाध्ययन व उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी विनोबा भावे आले. त्यावेळी विनोबा भावे २२ वर्षांचे होते आणि नारायणशास्त्री मराठे ४० वर्षांचे हाते. पण विनोबांची विचारपद्धती अगदीच वेगळी असल्याने त्यांनी नारायणशास्त्री यांना विचारले, ” ‘तुम्ही अस्पृश्यांना वेद शिकविणार का?’ तुमचा यामध्ये होकार असेल तर मी तुमच्याकडे शांकरभाष्य व उपनिषदांचे अध्ययन करण्यासाठी येईन”, नारायणशास्त्री मराठे यांनी विनोबांच्या प्रश्नाला होकार दिल्यानंतर विनोबा वाईमध्ये शिक्षणासाठी थांबले. या सर्व घटनेचा अर्थ असा की, प्राज्ञपाठशाळा या संस्थेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारे नारायणशास्त्री मराठे याचा पुरोगामी विचारांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. अशाच वातावरणात लक्ष्मण बाळाजी जोशी यांचे अध्ययन होत राहिले. विनोबा भावे हे तर्कतीर्थ जोशी यांचे सहाध्यायी होते. दरम्यानच्या काळात लोकमान्य टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. तो ग्रंथ विनोबांच्या हाती आल्यानंतर त्यांनी तो लक्ष्मण जोशी यांच्याकडे अभ्यासासाठी दिला आणि त्यातून लक्ष्मण जोशी यांच्या बुद्धीची झेप विनोबांना तपासायची होती. सुमारे एक आठवड्यानंतर विनोबांनी लक्ष्मण जोशी यांना ‘गीतारहस्या ‘बद्दल काही प्रश्न विचारले. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्ष्मण यांनी बिनचूक दिली आणि विनोबा आणि लक्ष्मण जोशी हे स्नेही ठरले.

१९१७ मध्येच लोकमान्य टिळकांचे वाई येथे आगमन झाले. ती तारीख होती १७ सप्टेंबर १९१७. लोकमान्य यांच्या आचार विचारांचा प्रभाव नारायणशास्त्री मराठे यांच्यावर होताच, त्याचा परिणाम म्हणजे १९१७ मध्ये लोकमान्य टिळकांना जे वाईकरांच्या वतीने सन्मानपत्र दिले गेले ते नारायणशास्त्री मराठे यांच्या हस्ते. याचवेळी लक्ष्मण जोशी म्हणजे पुढचे तर्कतीर्थ जोशी यांची लोकमान्य टिळकांबरोबरची पहिली भेट झाली. मुख्य म्हणजे प्राज्ञपाठशाळेमध्ये ह्यावेळी केसरीचा अंक येत असल्याने त्यातील अग्रलेखावर आधारित पाठशाळेतील विद्यार्थी साधक-बाधक चर्चा करीत असत. याचा परीणाम म्हणजे तर्कतीर्थ जोशींची वक्तृत्वशैली विकसित होत राहिली. अर्थात विनोबा भावे यांच्या जीवनशैलीचा व वर्तनाचा प्रभाव तर्कतीर्थ जोशी यांच्यावर सातत्याने पडत राहिल्याने विनोबांच्या विचारांतील महत्त्वाचा भाग म्हणजे श्रमदेवीची उपासना होती. विनोबा स्वतः वाईमध्ये असताना रोज पायली-दोन पायलीचे दळण दळत असत. त्याचाही परिणाम तर्कतीर्थ जोशी यांचेवर झाल्याने ते देखील श्रमदेवीचे उपासक होत राहिले. ‘गीतारहस्या’चे वाचन व विनोबांचा सहवास यामुळे शास्त्रीजी ‘कर्म’ या मूल्याचे आजीवन आचरण करत राहिले.

आरंभीच्या काळात शास्त्रीजीच्या जीवनावर व विचारांवर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव पडत राहिला आणि १९२० नंतर शास्त्रीजी महात्मा गांधींजींच्या आचार-विचारांकडे आकर्षित होत राहिले. याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकमान्यांचे जहाल क्रांतिकारक विचार आणि महात्मा गांधींच्या विचारांतील अहिंसा हे मूल्य यातून शास्त्रीजी क्रांतिकारक विचारांचे पालनकर्ते ठरले पण त्या क्रांतिकारक विचारांमध्ये अहिंसा हे मूल्य केंद्रीभूत होते.

आपल्या विचारांना साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी १९२७ मध्ये शास्त्रीजींना मिळाली. त्यावेळी ते २७ वर्षांचे होते. ‘आनंदमीमांसा’ हा त्यांचा पहिला निबंध ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाबाबत शास्त्रीजी म्हणायचे, “तत्त्वज्ञान व सामाजिक जीवन यांचा निकटचा व जिव्हाळ्याचा संबंध असतो. या दृष्टिकोनातून उपनिषदांतील आनंदतत्त्वाचे विवेचन केले आहे. भारतीय अध्यात्मवादाचा विश्वदुःखवाद ही नांदी आहे. विश्वाचे वास्तव स्वरूप आनंदमय ब्रह्म आहे. ह्या विचारांशी ही नांदी विसंगत आहे. विश्वाचे अंतीम तत्त्व व रहस्य म्हणजे सच्चिदानंद ब्रह्म होय. हा विचार सबंध जीवन व विश्व दुःखात्मक आहे. या जाणीवेतून स्वाभाविक रीतीने निघू शकत नाही. त्याची पार्श्वभूमी अगदी वेगळी आहे. ती म्हणजे सबंध विश्व आणि जीवन हे भव्य व सुंदर आहे अशी आशावादी भूमिका असलेला उपनिषदापूर्वीचा वेदविचार होय. विश्वाबद्दलचा आणि जीवनाबद्दलचा आदराने, आशेने व उत्साहाने भरलेला हा वैदिक विचार सच्चिदानंद ब्रह्मतत्त्वाची अनुभूती देऊ शकतो, असा सिद्धान्त आनंदमीमांसेत प्रतिपादिला आहे.”

तर्कतीर्थ जोशी यांच्या ‘आनंदमीमांसा’ या ग्रंथाचे वाचन करून २६/९/२८ रोजी न. चिं. केळकर यांनी सिमल्याहून पत्र लिहून तर्कतीर्थ जोशी यांच्या या ग्रंथाबद्दलची व त्यातील विचारांबद्दलची प्रशंसा केली आहे.

तर्कतीर्थ जोशी यांच्या राजकीय विचारांवर अनेकवेळा बदल होत राहिला. सुरुवातीस ते टिळक विचारांचे होते. टिळकांच्या निधनानंतर ते गांधींच्या विचारांकडे झुकले. १९३०च्या काळात ते मार्क्सवादी विचाराने प्रभावित झाले आणि त्या विचारांच्या आधारे त्यांनी ग्रंथनिर्मिती देखील केली. १९३३ नंतर शास्त्रीजी रॉय यांच्या विचारांनी प्रभावित झाले. याच विचारांनी प्रभावित झालेले त्यांना मित्र लाभले. द्वा. भ. कर्णिक, व. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, भाऊसाहेब तारकुंडे इत्यादी. १९४७ नंतर शास्त्रीजी लोकशाही विचारप्रणाली आदर्श मानत राहिले. त्याच्यामते लोकशाही ही दिव्य अशी राजकीय प्रणाली आहे. याच काळात प्रा. गोवर्धनदास पारीख यांचा ‘नवमानवतावाद’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथावर तर्कतीर्थ जोशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. मात्र त्यांनी मानवी स्वातंत्र्यमूल्यांचा विचार मांडला आहे. हा ग्रंथ वाई येथील प्राज्ञप्रेसने प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शास्त्रोनीनी विचारस्वातंत्र्य या मूल्याचा उल्लेख केला आहे.

“प्राज्ञमालेचा मुख्य उद्देश लोकांना स्वतंत्र रीतीने विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे ग्रंथ प्रकाशित करणे हा आहे. रूढीशरणता, शब्दप्रामाण्य, अंधविश्वास, गुरु व नेते यांच्या अधीन विवशपणे होण्याची प्रवृत्ती, भावनांच्या आहारी सापडणारा स्वभाव व सामुदायिक दडपणाखाली मनाचे व बुद्धीचे स्वातंत्र्य गमावण्याची सवय या गोष्टी व्यक्तीना दास बनवितात. अशा प्रकारचे मानसिक दास्य हे भारतीय जनतेने एक पवित्र लक्षण म्हणून मानले आहे. सुशिक्षितांतील बहुसंख्य लोकही असेच मानसिक दास आहेत. या दास्याचा अंत झाल्याशिवाय व्यक्तित्वाचा किंवा मानव्याचा खराखुरा विकास होत नसतो. व्यक्तीच्या ठायी दडून असणा-या कर्तृत्वशक्ती त्याशिवाय कार्यप्रवृत्त होत नसतात. विकसनशील व्यक्तित्व हेच मानव्य होय. या मानव्याची आवश्यकता भारतास आहे. भारताचे सर्वांगीण दैन्य हे देखील सामान्य माणसाच्या दैन्याचे कर्म आहे. मानसिक दैन्य बौद्धिक व वैचारिक जागृतीशिवाय नष्ट होणार नाही. वैचारिक मांद्य हेच या मानसिक दास्याचे सर्वसाधारण स्वरूप होय. हे मांद्य नष्ट करण्यास “वैचारिक संघर्षाची आवश्यकता असते.”

अशा त-हेचा स्वतंत्र विचार करण्याचे धडे शास्त्रीजींना केवलानंद सरस्वती यांच्या सहवासात मिळाले. याचे मुख्य कारण म्हणजे केवलानंद सरस्वती हे केवळ भारतातील परंपरावादी विचारांत कधीच गुंतले नाहीत. काळाबरोबर बदलत जाण्याची मानसिकता त्यांच्यात होती. ते स्वतः प्राशपाठशाळेतील विद्यार्थ्यांना संस्कृत साहित्यांतील वेद, उपनिषदे यांचेबरोबर इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांचे अध्यापन करीत असत. त्यांनी स्वतः इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला होता पण प्राज्ञपाठशाळेतील कार्यबाहुल्यामुळे त्यांना शक्य झाले नाही. परंतु त्यांना मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांच्या मराठी भाषेतील ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. या सर्वाचा परिणाम म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातोल विशालता स्पष्ट होते. केवलानंद सरस्वती हे स्वतः संगीततज्ञ होते आणि त्यांच्या ज्ञानशाखेचा परिणाम तर्कतीर्थ जोशी यांचेवर झाला. त्यांना स्वतः भारतीय संगीतातील रागदारी माहीत होती म्हणून त्यांनी कुमार गंधर्वाच्या गायनातील अचूकपण शोधून आस्वाद देखोल घेतला होता.

विनोबा भावे यांचेबरोबर सहाध्यायन करताना शास्त्रोजी विनोबा भावे यांचेकडून इंग्रजी भाषेचे ज्ञान घेत राहिले. १९१८ मध्ये विनोबांनी वाई सोडली आणि बडोद्यास गेले. त्याचकाळात तर्कतीर्थ जोशी हे केवलानंद सरस्वती यांची अनुमती न घेता विनोबांकडे बडोद्यास गेले. तेथे त्यांनी एक वर्ष वास्तव्य केले. याचा परिणाम म्हणजे त्यांना उत्तर आयुष्यात जे परकोय देशात सन्मान मिळाले त्या सन्मानांचा स्वीकार करताना त्यांनी इंग्रजी भाषेत व्यक्त केलेले मनोगत होय, तेवढेच नव्हे तर प्राज्ञपाठशाळामंडचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातील एका खंडास शास्त्रीजीनी लिहिलेली ९२ पानांची इंग्रजोलोला प्रस्तावना होय. अमेरिकन महिला ज्युलिसा लेस्ली व जपानी मुलगी मेरी मणी या दोन मुलींना इंग्रजो भाषेतून भारतातील देवदेवतांची शास्त्रीजीनी दिलेली सखोल माहिती, याच काळात या दोन मुलींनी तुळजापूरच्या भवानी मातेवर पी. एच. डी.चे प्रबंध लिहिले आणि या प्रबंधाचे मार्गदर्शक तर्कतीर्थ जोशी!

धुळे जिल्ह्यातील एका खेड्यातून आलेले शास्त्रीजी वाईमध्ये केवलानंद सरस्वती यांचेकडे वेद- उपनिषदांचा अभ्यास करीत राहिले हे जरी खरे असले तरी त्याच काळात शास्त्रीनी मराठी साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता. त्यांनी १९५१ मध्ये लिहिलेल ‘ वैदीक संस्कृतीचा विकास’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. वेदकाळापासून संस्कृतीचा होत राहिलेला विकास, त्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या विचारांची समीक्षा व त्या विचारांवर शास्वोजीनी केलेले चिंतन या सर्व गोष्टींचा समावेश आहे. वासाविक हा ग्रंथ म्हणजे त्यांनी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे, पण त्यांनी ज्या मराठी भाषेत लिहिला आहे, त्यातील शब्दप्रयोग, दिलेले संदर्भ व त्यावरील शास्त्रीजींचे भाष्य या गोष्टी लक्षणीय आहेत. वास्तविक शास्त्रीजी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते पण त्यांच्या लेखनात व भाषणात जे लालित्य होते याची दखल साहित्य अकादमीने घेतली आणि त्यांच्या या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार मिळाला. भाषेतील लालित्य या मूल्याचे शास्त्रीजींनी जाणीवपूर्वक जतन केल्याचे स्पष्ट होते. शास्त्रीजींच्या लेखनामागे सामाजिक जाणिवेचा मोठा भाग आहे. त्यामुळे त्यांनी ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य यांची अतूट नाती जुळविल्याचे स्पष्ट होते.

शास्त्रीजी स्वतः ललित साहित्य किंवा वैचारिक साहित्य याबद्दल म्हणतात, “ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य किंवा वैज्ञानिक साहित्य हे सामाजिक सहकार्याचे फलित असते. कारण भाषा ही सामाजिक शक्ती व सामाजिक निर्मिती असते. दलितांच्या अनुभवाला आणि विचाराला मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अद्वितीय महत्त्व आहे. कारण जीवसृष्टीमध्ये मानव हा सर्वश्रेष्ठ आणि जीवशक्तीचा कळस ठरला, याचे कारण तो परिस्थितीच्या बंधनातून इतर जीवांपेक्षा अधिक कुशलतेने मुक्त होत गेला आणि पुढेही सर्व बंधनांतून मुक्त होऊ शकेल, अशी योग्यता त्याला प्राप्त झाली आहे. ही योग्यता म्हणजे त्याची स्वातंत्र्याचा अधिकाधिक विस्तार करण्याची शक्ती.”

तर्कतीर्थ जोशी यांच्या विचारशैलीत जो महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे दलितांविषयीचे व त्यांच्या साहित्याविषयीचे प्रेम होय. कारण त्यांच्या मते दलित माणूस हा कित्येक पिढ्या विविध बंधनात अडकलेला होता व आहे. त्या सर्व वर्गास असंख्य वर्षे स्वातंत्र्याला मूल्यापासून फार दूर ठेवण्यात आले. त्या वर्गास स्वतःच्या भावना आणि विचार जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही किंवा अन्य सामाजिक वर्गातील लोकांनी ही संधी दिली नाही. या संपूर्ण दलित वर्गास मराठी साहित्य क्षेत्राने देखील उपेक्षित ठेवले. परंतु काळाच्या गतीमध्ये या वर्गास शिक्षणाची संधी मिळत राहिली. राजकीय स्वातंत्र्याबरोबर विचारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. दलित वर्ग वर्षानुवर्ष आपल्या दडपल्या गेलेल्या विचारांना व भावनांना व्यक्त करू लागला. त्यामध्ये त्यांना जसे विचारस्वातंत्र्य मिळाले तसे लेखनस्वातंत्र्य देखील मिळाले. त्यामुळे जसे राज्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलने होत राहिली. त्यांच्याबरोबर दलित साहित्य संमेलन भरविण्याच्या इच्छा व्यक्त होऊ लागल्या. त्यांना संमेलनाच्या माध्यमातून विचार भावना, सुख-दुःख व्यक्त करण्याचे साधन लाभले, दलित माणूस बोलू लागला.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दलितांबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केल्याची उदाहरणे आहेत. खुद्द त्यांचे गुरू केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ जोशी यांना मानवनिर्मित जाती व पंथ मान्य नव्हते. कारण खुद्द विनोबा भावे यांनीच केवलानंद सरस्वती यांना दलितांना वेद शिकविण्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. खुद्द शास्त्रीजी हे स्वातंत्र्य या मूल्याचे आचरण करीत होते. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे त्यांच्या घरी मेणवली या गावातील सावित्री गायकवाड ही दलित महिला चाळीस वर्षे स्वयंपाक करीत होती. त्यामुळे विचार आणि आचार या दोनही मूल्यांचे जतन शास्त्रीजी आयुष्यभर करीत राहिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रणदिवे नावाच्या एका दलित विद्यार्थ्यास तर्कतीर्थ जोशी यांचेकडे संस्कृत साहित्याच्या अभ्यासासाठी पाठविले होते आणि तो विद्यार्थी शास्त्रीजीच्या घरामध्ये राहत होताच पण त्यांच्या पत्नी सत्यवतीबाई जोशी यांचे स्वयंपाक घरात तो मुक्तपणे वावरत होता.

१९८१ मध्ये अमरावती येथे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. विश्वामध्ये दलित वर्गाकडे कसे पाहिले गेले व आजही पाहतात याची सविस्तर वैचारिक मांडणी शास्त्रीजींनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केली. शास्त्रीजी म्हणत, “अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ही घटना भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील अर्थपूर्ण घटना आहे. दलितांनी निर्माण केलेले किंवा दलित वर्गाच्या संदर्भात निर्माण झालेले साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. अशी जास्तीत जास्तव्यापक व्याख्या लक्षात घेऊन याप्रसंगी चर्चा करणे हे युक्त आणि उचित ठरेल. दलित साहित्याचा उदय युगांतर सूचक अशी घटना आहे. दलितांनी स्वतःच्या दलित जीवनाचा, म्हणजेच आत्म्याच्या संदर्भात साहित्यनिर्मितीच्या उद्योगाला लागावे, ही नव्या युगाची सूचक अशी लक्षणीय घटना ठरते.”

“ज्याचा स्वयंप्रकाश कायम धुकाळलेला आहे, असा मागील युगाचा दलित माणूस आणि आत्मदीप झालेला नवा दलित माणूस ही अगदी वेगळी निराळी माणसे होत. १९ व्या शतकापर्यंतचा मागील युगातला भारतीय दलित वर्ग आत्मप्रकाशाला युगानुयुगे गमावून बसला होता. त्याची पारतंत्र्याची जाणीव अगदी क्षीण होती. पारतंत्र्याची दुःखे व यातना स्पष्ट जाणीवेच्या विवेकबुद्धीच्या, चिंतनशील विवेचकतेच्या कक्षेत शिरत नसत तो विनातक्रार सहन करी. अन्याय्य समाजरचनेचे हे परिणाम आहेत याची जाणीव या २० व्या शतकात त्याला होऊ लागली आहे.” या सर्व घटनांमागील परिवर्तनामागे दडलेले मूल्य सांगताना शास्त्रीजी विचार स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य याबद्दलची मते मांडत राहिले.

भारतास १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि लोकशाही मूल्याचे पालन देशामध्ये होत राहिले, तरीदेखील समाजात उच्चवर्णीय व दलित वर्ग यांच्यातील दुरावा शिल्लक राहिला. पण या दुराव्याचे खंडन आपण आचार आणि विचारांच्या माध्यमातून केले पाहिजे याची जाणीव स्वामी केवलानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य तर्कतीर्थ जोशी यांना होत होती. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोरटी सोमनाथ येथील शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या निर्णयास काशी-वाराणसी येथील अनेक पुरोहितांनी नकार दिला कारण या घटनेमुळे मंदिरात दलितांना प्रवेश मिळणार होता. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ जोशी यांना निमंत्रित केले. यासाठी यजमानपद भूषविण्याचे महत्त्वाचे काम डॉ. राजेंद्र प्रसाद व त्यांच्या पत्नीने केले. यातून केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ जोशी यांच्या विचारांतील पुरोगामित्व स्पष्ट होते.

प्राज्ञपाठशाळेच्या जबाबदा-या जशा तर्कतीर्थ जोशी यांनी सांभाळल्या त्याच जबाबदा-या त्यांच्या निधनानंतर प्राचार्य मे. पुं. रेगे यांनी समर्थपणे सांभाळल्या. शास्त्रीजींचा सखोल अभ्यास पौवात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा होता तोच अभ्यास प्रा. रेगे यांचाही होता. परंतु रेगे सरांनी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबर नितीशास्त्राचाही अभ्यास केला होता. त्यांचे ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ हे पुस्तक याच विचारास वाहिलेले आहे. दोघेही तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असल्याने त्या उभयतांच्या ज्या चर्चा रोज होत असत त्यामध्ये तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राचा वारंवार उल्लेख होत राहिला. त्यामध्ये तर्कतीर्थ जोशी यांच्यामते कला आणि नीती यांचा संबंध मांडण्याची स्वतंत्र रीत होती. त्यांच्या मते कलेचा व नीतीचा संबंध कलेचे तत्त्व लक्षात घेता नीट लक्षात येईल. नीती हा कलेचा एक विषय आहे; बंधन नाही. नीती, अनीती, ईश्वर-अनिश्वर, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, सौंदर्य-कुरूपता, श्रम-विश्रांती, खेळ, व्यापार इत्यादी मनुष्याच्या भावनांची निर्मिती करणारे व भावनांना क्षुब्ध व शांत करणारे सगळे प्रकार कलेचा विषय बनतात. त्या भावनांच्या अनुकूल-प्रतिकूल संबंधांचा आविष्कार करणे एवढेच कलेचे कार्य आहे. दरोडेखोर, छिनाल, दारूबाज यांचे समर्थन किंवा विरोध न करता त्यांच्या जीवनाच्या गुंतागुंतीचा विषय
प्रत्यय आणून दिला म्हणजे कलेचे कार्य संपते. रौद्र, करूण, विभत्स व भयानक रसाला कलेत स्थान का मिळावे ? किळस येणा-या परिस्थितीचे भावस्वरूप उत्पन्न करून कला बाजूस सरते, त्यात बिभत्साचे समर्थनही नसते व निराकरणही नसते. करूणात रडावे हेही सांगावयाचे नसते व रडू नये हेही सांगायचे नसते; तसे म्हणले तर रडणे चांगले कोण म्हणेल ? पण साहित्यातले रडणे चांगले नसते का, संसारात ज्या भावना व्यथित करतात त्याच कलेच्या स्वरूपात आनंदाला कारण होतात.

शास्त्रीजींनी संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यास केला होताच, त्यातील साहित्यिक वादांवर मत प्रदर्शनदेखील केले होते. तसेच मराठी साहित्याचा त्यांनी केलेला अभ्यास लक्षणीय स्वरूपाचा होता. लोकमान्य टिळकांचे ‘केसरी’तील अग्रलेख व त्यांच्या विचारांतील सौंदर्य स्पष्ट करणारे लेखनही केले होते. गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनाबद्दल त्यांना विशेष आदर होता. विशेषतः आगरकरांची बुद्धिप्रामाण्यवादावरची मते शास्त्रीजींना मान्य होती. त्याच काळात प्राज्ञपाठशाळेत कार्यरत असणारे महादेवशास्त्री दिवेकर यांच्या अनेक मतांशी शास्त्रीजी सहमत होते. समाजाची तत्कालीन रचना बदलणे गरजेचे आहे हे मत शास्त्रीजींना मान्य होते आणि त्यांनी सारे आयुष्य समाजप्रबोधनासाठी खर्ची घातले. जाती-पाती, पंथ, सामाजिक वर्गातील विभिन्नता याबाबत शास्त्रीजी बेचैन असत पण हे सर्व बदलण्यासाठी त्यांनी सर्व लेखन खर्ची घातले.

१९४७ मध्ये तर्कतीर्थ जोशी यांचा ‘ज्योतिनिबंध’ प्रसिद्ध झाला. या ग्रंथास समाजसुधारक रा. ना. चव्हाण यांची प्रस्तावना आहे आणि या त्यांच्या प्रस्तावनेत विठ्ठल रामजी शिंदे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. फुले काय किंवा विठ्ठल रामजी शिंदे काय हे दोघेपण समाजातील तत्कालीन रचनेबाबत कठोर टीका करत राहिले आणि ती रचना बदलण्यासाठी ते आग्रही राहिले. फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या विचारांचे तर्कतीर्थ जोशींना आकर्षणदेखील होते. ज्योतिबा फुले यांच्या आचार- विचारांची मांडणी करताना शास्त्रीजी म्हणायचे, “परिणामक्षम सूक्ष्म मने असल्यामुळे आणि बुद्धी विचारशील आणि चौकस असल्यामुळे बदललेल्या परिस्थितीचा अर्थ अत्यंत व्यापकपणे ज्योतिबांना समजल्याशिवाय राहिला नाही. इंग्रजी राज्याच्या आगमनाने झालेल्या क्रांतीचा अर्थ त्यांना त्यांच्या काळात समजला तितका फरक थोड्या लोकांना समजला होता. स्वतःच्या परिस्थितीचा अर्थ समजणारे आत्मप्रत्ययशील लोकच स्वतंत्र होऊ शकतात आणि आत्मोन्नती करू शकतात.” तर्कतीर्थ जोशी यांनी लिहिलेल्या ‘ज्योतिनिबंध’ या ग्रंथामुळेच समाजातील त्यावेळच्या सुशिक्षित वर्गास ज्योतिबांच्या विचारांची ओळख झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांतील उदारमतवादाशी तर्कतीर्थ सहमत होते.

तर्कतीर्थ जोशी यांनी ‘हिंदूधर्माची समीक्षा’ हा ग्रंथ लिहीला. त्यामध्ये त्यांनी हिंदू धर्मातील रूढी- परंपरा आणि पारंपरिक दृष्टिकोन याबाबत आपले कठोर मतप्रदर्शन केले आहे. ज्यामुळे मानवी समाजाचा विकास थांबतो त्या त्याज्य आहेत असेही मत त्यांनी या ग्रंथात प्रतिपादिले आहे. तसेच त्यांनी ‘सर्वधर्म समीक्षा’ हा ग्रंथ लिहिला. त्यातही संपूर्ण मानवी समाजाच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासास अडथळा आणणा-या विचारांचा कठोरपणे परामर्ष घेतला आहे. या दोनही ग्रंथांच्या प्रसिद्धीनंतर मी स्वतः शास्त्रीजींना धाडस करून प्रश्न विचारला की,

“शास्त्रीजी तुम्ही कोणता धर्म मानता?”

शास्त्रीजी म्हणाले, “मी विश्वधर्म मानतो”,

शास्त्रीजींच्या विचारांतील हा विश्वव्यापक गुण समजावून घेणे आणि त्यासाठी नवीन पिढीने कार्यरत राहणे हीच त्यांच्या विचारांना आदरांजली ठरेल.

अनिल जोशी
सचिव
प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई
ppmwai@gmail.com

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!