सह्याद्री पत्रकार संघाच्या सदस्यांचा वेगळा नावलौकिक : सपोनी दिलीप पवार
![]()
पांचगणी पोलीस ठाण्यात पत्रकार दीन साजरा
पांचगणी l प्रतिनिधी
भोसे, तारीख. ६ : पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकाराच्या निर्भीड, निःपक्षपाती लेखणीमुळे अन्यायाला वाचा फुटते. सर्वसामान्य नागरिक आणि वंचितांना न्याय मिळतो. यासह चुकीच्या गोष्टीना पायबंद घालण्याची भूमिका पत्रकार कायम निभावत असतात. पांचगणीतील सह्याद्री पत्रकार संघाने प्रामाणिक आणि निःपक्षपाती पणामुळे आपला वेगळा नावलौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी काढले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पांचगणी पोलीस ठाण्यात शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आज पार पडला यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सर्वानी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत सत्कार केला.
श्री पवार पुढे म्हणाले पर्यटन स्थळावरील पत्रकारांची वेगळी ओळख आहे. ती कायम ठेवून आम्ही केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावेच पण आमच्या त्रुटी, चुका दाखवण्याचे ही काम आवर्जून करावे जेणेकरून आमच्या कामकाजात सुधारणा करता येईल.
यावेळी सर्व पत्रकारांनी आमचा नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांना मदतीचा हात असतो आणि राहील याची ग्वाही दिली.
यावेळी पत्रकार रविकांत बेलोशे, मुकुंद शिंदे, लहू चव्हाण, सचिन ननावरे, सचिन भिलारे, दिलीप पाडळे , महेश ननावरे ,प्रमोद रांजणे आदी उपस्थित होते.













