Mon, Mar 2, 2026
सामाजिक

आपल्या तलवारबाजीने विश्वाला गवसणी घालणारी आर्या…

आपल्या तलवारबाजीने विश्वाला गवसणी घालणारी आर्या…
Ashok Ithape
  • PublishedOctober 19, 2024

कु. आर्या मुकेश पोळ ही मुलगी वाई जवळील धौम्य ऋषींच्या तपोभूमी तील धोम (धोम्य)या गावची अत्यंत तेजस्वी अशी सुकन्या आहे. तिचे वडील श्री मुकेश पोळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. आपली देशसेवा बजावून काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.तिची आई सौ. मनिषा पोळ या शिक्षिका आहेत . पोळ दांपत्यास आर्या आणि तिचा छोटा भाऊ अशी अपत्ये आहेत.

या घरात राष्ट्रभक्ती,शिस्त, समाजसेवा, विद्येच्या उपासणे बरोबरच क्रीडा क्षेत्रातील संस्कार वारसाहक्काने आलेले आहेत. येथूनच तिच्या खेळाडू म्हणून जडण घडणीची खरी सुरुवात झाली.
वाई हे तिर्थक्षेत्र असून विद्येचे माहेरघर आहे.तेव्हा आपली मुले विशेष अशी गतीमान व कार्यरत व्हावी म्हणून उभयतांनी मुला व मुलींच्या शिक्षणासाठी धोम या गाव तून वाईला प्रस्थान केले. आर्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे दिशा पब्लिक स्कूल वाई मध्ये झाले. लहानपणा पासूनच आर्या होतकरु असल्यामुळे ,नवीन काही तरी करुन दाखवण्याची जिद्द व तिच्या जिज्ञासू वृत्तीला आपोआप वाव मिळत गेला. खेळाडू म्हणून विशेष प्राविण्य मिळवलेली आर्या ही शैक्षणिक क्षेत्रातही अग्रगण्य होती हे तिला इयत्ता दहावीत मिळालेल्या ९३℅ गुणावरून दिसून येते.

आर्याचा स्वभाव तसा खेळकर, हरहुन्नरी असल्याने शाळेतील मैदाना वर तिच्या महत्वकांक्षेला फुलपाखरा सारखे पंख फुटत होते. दहावीतील या मुलीला आपल्या भारताचे नाव साऱ्या जगात गाजवावे असे मनापासून वाटत होते. नव्हे -नव्हे हेच तिचे स्वप्न होते.
क्रीडाक्षेत्रातील अनेकविध खेळ व माहिती सांगणाऱ्या आधुनिक द्रोणाचार्यासमानअसणाऱ्या शिक्षकांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.इयत्ता दहावीनंतर किसनवीर कनिष्ठ महाविद्यालयात तिने विज्ञान शाखेतून प्रवेश घेतला.

लहानपणापासूनच खेळामध्ये निपुण असलेल्या या मुलीला आधुनिक द्रोणाचार्य श्री प्रफुल्ल जगताप सर ( NIS Fencing) व
श्री विकास लोखंडे सर ( NIS Fencing) यांनी तलवारबाजी या खेळाचे महत्वपूर्ण धडे दिले .तिने तलवारबाजी या खेळाचा प्रारंभीक सराव नरसिंह हायस्कूल धोम मध्ये व तदनंतर वाई हायस्कूल मध्ये केला.

तिला नुकतेच सतरावे वर्ष लागले होते. ग्रामीण भागातील या मुलींने इतक्या छोट्या वयात केलेली प्रगती ही विशेष व कौतुकास्पद आहे.
तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. ज्यामध्ये तिला राज्यस्तरावर दोन सुवर्णपदके वराष्ट्रीय स्तरावर सहा रौप्यपदके मिळाली.

मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील नुकत्याच झालेल्या खुल्या गटातील राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्पर्धामध्ये तिने आपली आगळीवेगळी छाप सोडली . ऑस्ट्रेलियाच्या पस्तीस वर्षीय निष्णात खेळाडूला तिच्यापेक्ष्या निम्म्या वयाच्या आर्याने कडवी झुंज दिली परंतु दुर्दैवानं ही मॅच दोन गुणांच्या फरकाने आर्याने गमावली.
आता तिचा आंतरराष्ट्रीय सराव सुरु झाला होता. ती आपल्या कारकिर्दीच्या अतिउच्च टप्प्यावर होती.

काही दिवसापूर्वी आर्या आजारी पडली. आता तिच्या जीवन मरणाची लढाई सुरु झाली .ज्यात तिने मृत्यूला ही कडवी झुंज दिली.
अखेरीस गुरुवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. सर्वांना हवीहवीशी वाटणारी आर्या, निष्कील, खेळकर व खोडकर असलेली आर्या आता आपल्यात नसणार याची कल्पनाच करवत नाही. तिच्या स्मृतींना उजाळा देताना तिच्या अनेक नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू संपत नाहीत.

तिच्या अचानक जाण्याने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शेवटी मला मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आठवतात अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती,दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसाची नाती……..
ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो….

शब्दांकन श्री. प्रशांत भानुदास थोरवे
मु.पो व्याहळी कॉलनी, तालुका – वाई, जिल्हा – सातारा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!