राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले संवर्धन व वृक्षारोपण मोहिम
वाई l प्रतिनिधी :
“राजे फाऊंडेशन”(महाराष्ट्र राज्य) ही संस्था २०१२ पासून मुंबई तसेच महाराष्ट्रात कार्यरत आहे, महाराष्ट्राचे आराध्दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवविचार व शिवसंस्कार यांचा महाराष्ट्रभर प्रसार करणे हे संस्थेचे मूळ ध्येय आहे. आतापर्यंत संस्थेने खूप समाजोपयोगी कामे केलेली आहेत, मुख्यतः रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,शिवजन्मोत्सव सोहळा, शिववक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम संस्था आयोजित करत असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे, तो आपला इतिहास आहे, त्याबाबत आपली पुढची पिढी जागृत असायला हवी, त्यासाठी महाराजांचे गड व किल्ले यांची जपणूक ही व्हायलाच हवी हा विचार समोर ठेवून संस्था किल्ले संवर्धन ही मोहीम हाती घेत असते.
त्यासाठी यावर्षी छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मुघलांकडून किल्ले श्री तोरणा (प्रचंडगड) हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. आणि तोच किल्ला आपल्या संस्थेने मोहिमेसाठी यावर्षी निश्चित केलेला आहे. तेथे स्वच्छता असणे फार गरजेचे आहे.
राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले संवर्धन व वृक्ष रोपण मोहिमेत मुंबई , पुणे, येथून जवळपास ५० शिलेदार यावेळी उपस्थित होते. त्यात संस्थेचे अध्यक्ष – सिद्धांत अशोक पिसाळ, उपाध्यक्ष – योषित नागावकर,मयुरेश पाटील, सचिव – रोहित अशोक पिसाळ, उपसचिव- संतोष पवार खजिनदार – पंकज कोल्हे , उपखजिनदार – अमित जाधव , कार्यकारणी सदस्य – अशोक कुडले, गजानन सावंत, प्रवीण पड्याल , सुदर्शन देसाई, प्रशांत गुप्ता, महादेव जगदाळे, रवींद्र सडेकर, निलेश कांबळे, अनिकेत पवार हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व शिलेदारांनी किल्ले तोरणा चढून सर केला. गड सर करत असताना जी पायवाट आहे ,ती साफ करण्यात आली, कचरा उचलून गोळा केला.
गडावर पोचल्यावर महादेवाचे मंदिर दर्शन घेण्यात आले. किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे गाव परिसरात आणि इतरत्र जवळपास ५० झाडे लावण्यात आली. त्यात प्रामुख्याने फळझाडे , फुलझाडे वटवृक्ष व औषधी वनस्पती यांचा समावेश होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वेल्हे मा. श्री गोविंद लंगोटे साहेब ,वनपाल वैशाली हाडवळे मॅडम, वनरक्षक सारिका बैलुमे, भाग्यश्री जगताप आणि स्वप्निल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस असून देखील सुद्धा सर्व वनरक्षक अधिकारी शासकीय कर्मचारी मोहिमेसाठी स्वतः जातीने उपस्थित होते. उपरोक्त संस्था ही वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचे मुख्य उद्देश म्हणजे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत नाही आणि डोंगर माथ्या वरती झाडांमुळे, झाडांच्या मुळांमुळे डोंगराची माती घट्ट पकडून ठेवण्यास मदत होते त्यामुळे डोंगरावरील माती किंवा डोंगर ढासळत नाही .किल्ले तोरणा येथे पायऱ्या चढून गेल्यावर महादरवाजा आहे तो परिसर साफसफाई करण्यात आला व त्या बुरुजावरती वाढलेले गवत साफ करण्यात आले. तेथे गोळा झालेले शेवाळे हे साफ करण्यात आले.
शिवकालीन काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी जे आउटलेट होते ते पावसामुळे दगड माती ढासळून बुजले होते ते खुले करण्यात आले. तेथे पडझड झाली होती ते दगडी उचलण्यात आले. वरती गेल्यावरती जे पाण्याचे तलाव आहेत तेथे तलावांची स्वच्छता करण्यात आली. प्रशासनातर्फे गड चढताना जे रेलिंग लावण्यात आलेले आहे ते रेलिंग बहुतांशी ठिकाणी ढिले झालेले आहेत तर ते रेलिंग फिट करण्यात आले तसेच झुंजार माची येथे जाणारी जी शिडी आहे आणि जो रोप लावण्यात आलेला आहे ती शिडी व तो रोप फिट करण्यात आला व त्या जागेवरील शेवाळे साफ करण्यात आले तेथे उतरताना जे गवत वाढलेले होते ते गवत साफसफाई करण्यात आले.
बुधला माची व हत्तीचा बुरुज येथील वाढलेले गवत आणि शेवाळे साफ करण्यात आले तेथे पाण्याचा निचरा होत नव्हता पाणी एका जागी साचून होते त्याला आउटलेट काढण्यात आला. लकडखाना परिसर साफ करण्यात आला तेथे कचरा उचलून एका जागी डम्पिंग केला.मेंगाई देवीचे मंदिर साफ करण्यात आले. वरती संस्थेच्या सर्व शिलेदारांनी एकत्रित येऊन महाराजांना नतमस्तक होऊन तेथे घोषणा देण्यात आल्या. सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.













