कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी 30 एकर जागा हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय..
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अत्याधुनिक क्रिकेट क्रीडांगण उभारण्यासाठी 30 एकर जागा हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी जमीन मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लवकरात लवकर बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, काल मुंबईत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत करवीर तालुक्यातील विकासवाडी परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात जमिनीपैकी 30 एकर जमीन जिल्हा क्रिकेट असोसिएशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवर अत्याधुनिक सुविधा असलेले क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार असून, त्याचा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन उचलणार आहे.
हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा विश्वासाठी मैलाचा दगड ठरेल. अनेक ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी आणि खेळाडूंनी अनेक वर्षे स्वप्नात पाहिलेले क्रीडांगण आता साकार होणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. यासाठी सदैव सकारात्मक राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विकासवाडीचे ग्रामस्थ, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सभासद आणि जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खेळाडूंचे मनःपूर्वक आभार मानतो.
या बैठकीला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. डी गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू , उपस्थित होते. तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी बानीलिमा आडसूळ व्हि.सी. द्वारे बैठकीला सहभागी झाले होते.













